अमेरिकेमध्ये भारतीय अथवा भारतीय वंशाच्या नागरिकांवर वर्णद्वेषी हल्ले झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना आणखी एका भारतीय वंशाच्या नागरिकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा हल्ला वर्णद्वेषातून झालेला नसून रस्त्यावर गोळीबार सुरू असताना गोळी लागून या नागरिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेमध्ये टेनेसी राज्यामध्ये ही घटना घडली आहे. खंडू पटेल असे गोळी लागून मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. पटेल हे ‘अमेरिकाज् बेस्ट व्हॅल्यू इन अँड सुईट्स’ येथे हाऊसकिपिंगचं काम करत होते. ही सोमवारी घडलेली घटना असून आपलं काम संपवून पटेल त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडले होते. त्याचवेळी दोन गटांमध्ये गोळीबार सुरू होता. त्यांच्या छातीत गोळी लागली. जखमी झालेल्या पटेल यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. खंडू पटेल यांच्या मृत्यूमुळे भारतीय वंशाच्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेत आतापर्यंत भारतीय वंशाच्या पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

२२ फेब्रुवारीला श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय इंजिनीअरची अमेरिकेमध्ये गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. अमेरिकेतील कॅन्सस शहरात ही घटना घडली होती. अमेरिकेच्या नौदलात काम केलेल्या एका अधिकाऱ्याने श्रीनिवासची हत्या केली होती. त्या आधी तो ‘गेट आऊट ऑफ माय कंट्री’असं ओरडून म्हणाला होता. त्यानंतर मार्चमध्ये हर्निश पटेल या व्यक्तीची साऊथ कॅरोलायनामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. घराजवळच त्याचा मृतदेह सापडला होता. नंतर २३ मार्चला शशिकला नारा आणि त्यांचा मुलगा अनीश नारा यांची हत्या झाली होती.