खानपान सेवा देणारा व्यक्ती ट्रॉलीवरुन खाद्यपदार्थ घेऊ येतोय… नीटनेटक्या गणवेशातील कर्मचारी… ट्रेनमध्येच मनोरंजनाची सुविधा….आधुनिक स्वच्छतागृह…. रेल्वे प्रवासादरम्यान स्वप्नवत वाटणारे हे दृश्य आता प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने राजधानी आणि शताब्दी या एक्स्प्रेस गाड्यांचे मेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला असून ऑक्टोबरपासून मेकओव्हर केलेल्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

राजधानी आणि शताब्दी या प्रीमिअर ट्रेन्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. यामध्ये १५ राजधानी आणि १५ शताब्दी एक्स्प्रेसचे मेकओव्हर होणार आहे. यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेने ‘सुवर्ण उपक्रम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सुवर्ण उपक्रमांतर्गत या एक्स्प्रेस गाड्यांधील अंतर्गत रचना आणखी आकर्षक केली जाणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, ट्रेनमधील साफसफाई, ट्रेन वेळेवर सोडणे यावरही भर देण्यात येणार आहे.

राजधानी आणि शताब्दी ट्रेनमधील अस्वच्छता, ट्रेन उशीराने येणे अशा असंख्य तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत रेल्वेने शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये मेकओव्हरचा निर्णय घेतला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय ट्रेनमधील सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला जाणार असून यात रेल्वे सुरक्षा दलाची (आरपीएफ) मदत घेतली जाणार आहे.

राजधानी आणि शताब्दी या गाड्यांमधील खानपान सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या गणवेशाकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे. खाद्यपदार्थाच्या दर्जासोबत खाद्यपदार्थ देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना नवीन गणवेशही दिले जाणार आहे. याशिवाय प्रवासादरम्यान चित्रपट, मालिका आणि गाणी ऐकण्याची सुविधा दिली जाणार आहे.