उत्तर प्रदेशात एकापाठोपाठ झालेल्या मोठ्या रेल्वे अपघातानंतर अखेर रेल्वे मंत्रालय खडबडून जागे झाले आहे. या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने आता मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा तंत्र आणि मार्गावरील गस्त सुधारण्यासाठी पुढील दोन वर्षांत सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

सध्या रेल्वेच्या सुरक्षा विभागात १६ टक्के जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठीच भरती करण्यात येणार आहे. देशातील ६४ हजार किमी लांबीच्या रेल्वे मार्गाची देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. भारतीय रेल्वे ही रोजगार देणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या संस्थांमध्ये सामील असून भारतीय रेल्वेकडे सद्यस्थितीत १३ लाख कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने होत असलेल्या अपघातामुळे रेल्वे मार्गांच्या देखभालीचा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तीन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या खतौली येथे कलिंगा उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रूळांवरून घसरून भीषण अपघात झाला होता. या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला होता तर १२ लोक जखमी झाले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे कैफियत एक्स्प्रेस रूळावरून घसरली होती. यामध्ये तब्बल ७४ प्रवासी जखमी झाले. तसेच गेल्या तीन वर्षांत झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये सुमारे ६५० हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वे खात्याच्या कारभारावर मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे. त्यामुळेच देशभरात पसरलेल्या रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी १५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. ही रक्कम रेल्वेच्या आधुनिकीकरणावर खर्च करण्यात येणाऱ्या रक्कमेपेक्षा वेगळी असेल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोष’ या नावाने नव्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिली आहे.

लागोपाठ दोन अपघातांनंतर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांचा राजीनामा

रेल्वे अपघात रोखण्यासाठी गँगमन आणि रेल्वेरूळाची पाहणी करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल. रेल्वे रूळाची पाहणी करण्यासाठी १०० हून अधिक तपासणी वाहने खरेदी करण्याचा रेल्वेचा विचार आहे. याशिवाय रेल्वे रूळाला तडे गेल्यास त्याची तात्काळ माहिती देणारी सेंसर टेक्नॉलॉजीही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

वेळेत येणे सोडाच पण आता गाड्या रुळावर राहणेही अवघड; सेहवागचा रेल्वेला टोला