ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन यांनी शिक्षण क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय शिक्षकांसाठी १० लाख  डॉलरचा पुरस्कार जाहीर केला आहे.
केरळचे उद्योगपती व दुबई येथील वार्के जीईएमएल फाउंडेशनचे संस्थापक सनी वार्के यांनी हा पुरस्कार ‘ग्लोबल एज्युकेशन अँड स्कील्स फोरम २०१४’ या परिषदेत जाहीर केला आहे. हा पुरस्कार केवळ पैसा म्हणून नाही तर धैर्य व प्रेरणेच्या हजारो कहाण्यांना साद घालण्याचा प्रयत्न आहे. अगदी खेडी, शहरे व महानगरे यातील शिक्षक यात भाग घेऊ शकतील व मला हा पुरस्कार हवा आहे, असे म्हणू शकतील फक्त त्यांना तशी कामगिरी करून दाखवावी लागेल, असे युनेस्कोचे सदिच्छा दूत पद्मश्री वार्के यांनी सांगितले. जागतिक शिक्षक पुरस्कार समितीकडून पुरस्कार्थीची निवड केली जाईल. या समितीत ऑस्कर विजेते अभिनेते केविन स्पेसी यांचाही समावेश आहे.
जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा अनुभवी अभिनेत्यांनी आपल्याला प्रेरणा दिली. त्यांनी व्यावसायिक पद्धतीने अभिनय करण्याचा सल्ला आपल्याला दिला. अशा व्यक्तिगत पाठिंब्याने व अनुभवी व्यक्तींची साथ लाभल्याने तरुणांची क्षमता पुढे येते असे स्पेसी यांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष व वार्के जेम्स फाउंडेशनचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी सांगितले, की शिक्षण क्षेत्रातील चांगले लोक निवडणे, त्यांच्याविषयी आदर बाळगणे महत्त्वाचे आहे. सामान्य लोकांपैकी कुणीही शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकाची शिफारस करू शकतो ऑनलाइन अर्ज ५ ऑक्टोबपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. ग्लोबल एज्युकेशन अँड स्कील्स फोरमच्या दुबई येथे २०१५ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात विजेत्या शिक्षकाचे नाव जाहीर केले जाईल. विजेत्या शिक्षकास दहा वर्षांत हप्त्यांनी पुरस्काराची रक्कम दिली जाईल.
 शाळेतील कामाशिवाय विजेत्या शिक्षकास वार्के जेम्स फाउंडेशनचे जागतिक दूत म्हणून काम करावे लागेल. सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागेल. विजेतेपदासाठी पाच वर्षे शिक्षक म्हणून काम केलेले असले पाहिजे. प्राइस वॉटरहाउस कूपर या कंपनीला पुरस्काराची मतदान प्रक्रिया पारदर्शक रीत्या पार पाडण्यासाठी काम दिले आहे.