एका असहाय हत्तीला शेजारील राष्ट्र बांगलादेशातून परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मदतकार्य पथक पाठविण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आसाममधील ब्रह्मपुत्र नदीच्या जोरदार प्रवाहातून वाहात हे गजराज बांगलादेशात पोहोचले. बांगलादेशातून या हत्तीला परत भारतात आणण्यासाठी एक विशेष दल पाठविण्यासाठीची राजनैतिक पातळीवरील संमती मिळाल्याचे वन, पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. आसाममधील मुख्य वन्यजीव अधिकारी दलाच्या सदस्यांसाठी बांगलादेशाचा व्हिसा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेचे संचालक आर. के. श्रीवास्तव यांनी वृत्तसंस्थेला सांगिलते की, तीन ऑगस्ट रोजी एक दल बांगलादेशात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी हवामानाच्या स्थितीवर हे अवलंबून असल्याचेदेखील ते म्हणाले. या हत्तीच्या सुटकेसाठी काम करणारा मंत्रालयातील विभाग बांगलादेशातील वन विभागाशी चर्चा करत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. आसाम आणि मेघालयच्या वन्यजीव वॉर्डनसह अन्य संस्था हत्तीला परत भारतात आणण्यासाठी एकमेकांशी संपर्कात आहेत.