मागील आठवड्यात लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या वादासाठी चीनने भारताला जबाबदार धरले आहे. १५ ऑगस्टला लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. त्यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेला भारतीय सैन्यच जबाबदार असल्याचा कांगावा चीनकडून करण्यात आला आहे. १५ ऑगस्टला चिनी सैन्याने पँगाँग सरोवर परिसरातून घुसखोरीचा प्रयत्न केले होते. मात्र भारतीय सैन्याने चिनी सैन्याचे प्रयत्न हाणून पाडले होते.

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ९ या दरम्यान चीनकडून पँगाँग सरोवर परिसरातून दोनदा घुसखोरीचा प्रयत्न झाला. यावेळी भारतीय सैन्याने चिनी सैन्याला रोखले. यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतीय जवानांनी स्वत:च्या संरक्षणासाठी चिनी सैन्यावर दगडफेक केली. यामध्ये दोन्ही बाजूंचे काही सैनिक जखमी झाले. या घटनेसाठी चीनकडून भारताला जबाबदार धरण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना, चिनी सैन्य संरक्षणासाठी नियंत्रण रेषेवर गस्त घालत होते, असे चीनने म्हटले होते.

‘दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आल्यावर भारतीय सैन्याने हिंसक कारवाई सुरू केली. त्यामध्ये चीनचे काही सैनिक जखमी झाले,’ असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना दोन्ही देशांच्या लडाखमधील कमांडर्सनी या प्रकरणाविषयी एकमेकांशी बातचीत केल्याचे भारताने म्हटले. ‘भारतीय सैन्याची कृती निराशाजनक आहे. याबद्दल आम्ही भारताकडे स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले. भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सिक्किम सीमेवरील डोकलाममध्ये तणातणी सुरु आहे.