दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील सैनिक किरकोळ जखमी

जम्मू-काश्मीरच्या लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात मंगळवारी चीनच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क भारतीय सेनादलांनी तो वेळीच उधळून लावला. मात्र चिनी सैनिकांना अटकाव करताना दोन्ही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीत काही सैनिक जखमी झाले. काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले. लष्कराच्या नवी दिल्लीतील प्रवक्त्याने या घटनेबद्दल बोलण्याचे टाळले.

सिक्कीमजवळील डोकलाम येथील वर्चस्वाच्या मुद्दय़ावरून गेला महिनाभर भारत व चीनमध्ये वाद सुरू असतानाच आता चीनने लडाख सीमेवरही भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवराचा ४५ किमी लांबीचा भाग भारतात तर ९० किमी लांबीचा भाग चीनच्या ताब्यात आहे.

या सरोवराच्या किनाऱ्यावरील फिंगर फोर आणि फिंगर फाइव्ह या ठिकाणी चिनी सैन्याने स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी ६ ते ९ वाजण्याच्या दरम्यान दोन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वेळा भारतीय सैन्याने तो हाणून पाडला.

चीनचे सैनिक भारतीय हद्दीत घुसत असताना भारतीय जवानांनी मानवी साखळी करून त्यांना अडवले. मात्र त्यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याला भारतीय जवानांनीही तसेच उत्तर दिले. या दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील काही सैनिक किरकोळ जखमी झाले. सुमारे अध्र्या तासात परिस्थिती आटोक्यात येऊन दोन्ही बाजूंकडून एकमेकांना फलक दाखवण्यात आले व दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या जागेवर परतले.

भारताकडून यंत्रणा सज्ज

पँगाँग सरोवर परिसरावरील हक्काचा मुद्दा भारताने १९९०च्या दशकात उचलून धरल्यावर चीनने त्याला विरोध केला. चीनच्या म्हणण्यानुसार हा भाग त्यांच्या ताब्यातील अक्साई चीनमध्ये येतो. भारताचा त्याला विरोध आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत ५ किमी लांबीचा फिंगर फोर या ठिकाणापर्यंत रस्ता बांधला आहे. हा भाग सिरी जाप प्रदेशात येतो. यापूर्वी २०१३ साली लडाखमधील देपसांग व दौलतबेग ओलडी या ठिकाणी चीनने केलेल्या घुसखोरीवेळीही या भागात तणाव राहिला आहे. भारताने आता पँगाँग सरोवरात गस्तीसाठी अमेरिकी बनावटीच्या वेगवान नौका घेतल्या आहेत. त्या शस्त्रे, रडार आणि जीपीएस यंत्रणांनी सज्ज आहेत.