सौदी अरेबियात फसलेल्या भारतीय कामगाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे. मी सौदी अरेबियात फसलो आहे, आता माझ्याकडे पैसेही नाहीत, मला घरी परतायंच, माझी मदत करा असे कामगाराने म्हटले आहे.

ट्विटरवर संग्राम सिंग यांनी भारतीय कामगाराचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमधील कामगार स्वतःचे नाव सूर्यभान विश्वकर्मा असे सांगतो. मला एका कंपनीमध्ये काम असल्याचे सांगण्यात आले. मला १,५०० रुपये पगार (त्याला सौदीतील चलनानुसार १,५०० दिराम म्हणायचे असावे) आणि ४ तास अतिरिक्त काम केल्याचा पगार मिळेल असे सांगण्यात आले होते. मी माझे दुकान बंद करुन सौदीत आलो. पण इथे आम्हाला एका बांधकाम साईटवर कामासाठी ठेवण्यात आले आहे. दीड महिन्यांपूर्वी सौदीत येताना माझ्याकडे २५० दिराम होते. पण ते संपले असून कामाच्या मोबदल्यात मिळालेले २०० दिराम जेवणात खर्ची झाले असे सूर्यभानचे म्हणणे आहे. या व्हिडीओत सूर्यभानला अश्रू आवरता आले नाही.  मी इकडे येऊन फसलोय, आता मला घरी परतयाचे आहे, माझ्याकडे पैसेदेखील नाहीत, माझी मदत करावी’ अशी मागणी त्याने भारत सरकारकडे केली आहे. या व्हिडीओवरुन सूर्यभानला फसवून सौदीत नेल्याचे स्पष्ट होत आहे. त्याला कोणत्या एजन्सीमार्फत सौदीत पाठवले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. आम्हाला पगारही वेळेत मिळत नाही, जेवण मिळणेही कठीण झाले आहे असे या कामगाराचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर सूर्यभानचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लाखो युजर्सनी हा व्हिडीओ बघितला आहे. केंद्र सरकारने सूर्यभानला मदत करावी असे मतही आता व्यक्त होत आहे. सौदी अरेबियामधील नियमानुसार कामगाराला त्याच्या मालकाच्या परवानगीशिवाय देश सोडता येत नाही. सूर्यभानच्या या व्हिडीओमुळे सौदीत अडकलेल्या भारतीय कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुलैमध्ये सौदी अरेबिया आणि कुवैतमधील १० हजार भारतीय कामगारांनी नोकरी गमावली होती. या कामगारांना पगारही देण्यात आला नव्हता. शेवटी केंद्र सरकारने या कामगारांना अन्नाची पाकिट पुरवली होती.