सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये तीन दिवसांपासून ८०० भारतीय उपाशी असल्याचे एका भारतीयाने टि्वट करुन सांगितल्यानंतर भारत सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, सौदीमध्ये अन्नाविना फक्त ८०० भारतीयांचेच नव्हे तर, दहा हजाराहून अधिक भारतीयांचे हाल होत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. सौदीत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


अचानक नोक-या गेल्यामुळे सौदी अरेबियामध्ये १० हजाराहून अधिक भारतीय कामगारांचे हाल होत असून त्यांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सौदीमध्ये राहाणा-या तीस लाख भारतीयांना या कठीण काळात आपल्या बंधु-भगिनीना मदत करण्याचे आवाहनही स्वराज यांनी ट्विटरद्वारे केले.


एका व्यक्तिने सौदीतील परिस्थीबाबत ट्विट केले होते. त्यानंतर स्वराज यांनी लगेचच पावले उचलली. जवळपास ८०० जण गेल्या तीन दिवसांपासून जेद्दाहमध्ये उपासमारीला सामोरे जात आहेत, असे ट्विट करत त्या व्यक्तिने सुषमा स्वराज यांना याप्रकरणी दखल घेण्याची विनंती केली होती. त्यावर स्वराज यांनी सौदी अरेबियामधील बेरोजगार भारतीय कामगारांना मोफत रेशन देण्याच्या रियाधमधील भारतीय दूतावासाला सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी टि्वटरवरुन दिली. तसेच त्या म्हणाल्या की सौदी आणि कुवेतमध्ये बरेच भारतीय नागरिक रोजगार आणि पगाराच्या समस्यांना सामोरे जात आहेत. तसेच, सौदीमध्ये अन्नाविना फक्त ८०० भारतीयांचेच नव्हे तर, दहाहजाराहून अधिक भारतीयांचे हाल होत असल्याचेही त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले.