येत्या ७ मे रोजी होणारी ब्रिटनची सार्वत्रिक निवडणूक अतिशय चुरशीची तर होणार आहेच, शिवाय आतापर्यंतची सर्वाधिक भारतीय स्वाद असल्याबाबत तिची इतिहासात नोंद होणार आहे.
देशात सर्वत्र पसरलेल्या सुमारे १५ लाख भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची स्तुती करणाऱ्या हिंदी प्रचारगीताचे ‘बॉलीवूड स्टाइल’ विमोचन करण्यापासून तर ब्रिटनमधील गुरुद्वारे आणि मंदिरे यांना भेटी देणे असे प्रकार सर्वच प्रमुख राजकीय पक्ष करत आहेत.
ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळापासून भारतीय वंशाचे खासदार असलेले कीथ वाझ यांनी नुकतेच आपल्या लेसिस्टर मतदारसंघात प्रचारासाठी आणलेले बॉलीवूडमधील अभिनेता अभिषेक बच्चन यांनी चांगली गर्दी खेचली होती.
हे सर्व प्रत्येक मतावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न असल्याचे विदेशी भारतीय उद्योजक लॉर्ड स्वराज पॉल यांनी सांगितले. संपूर्ण भारतीय समुदायासाठी सर्वात चांगले काम करणाऱ्या पक्षाकडे भारतीयांचे लक्ष असते. आतापर्यंत मजूर पक्षाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला आहे. परंतु कॅमेरून यांना या क्षणी सर्व प्रकारच्या मदतीची गरज आहे असे ते म्हणाले. सत्ताधारी कान्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षाला या वेळी कडव्या मुकाबल्याचा सामना करावा लागणार असल्याचे भाकीत त्यांनी केले.
ब्रिटनमधील सर्वात मोठा स्थलांतरित गट भारतीयांचा असून, कॉमनवेल्थ नागरिकत्वामुळे या देशात सुमारे ६ लाख १५ हजार भारतीय स्थलांतरित मतदार आहेत. भारतातून स्थलांतरित झालेल्यांच्या ब्रिटनमध्ये जन्मलेल्या मुलांचा यात समावेश आहे.