हैदराबादमध्ये २१ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या काही तासांपूर्वीच ‘प्रे, इट वर्क्स’ (प्रार्थना करा, काम सुरळीत होवो) अशा आशयाच्या मेसेजची दहशतवाद्यांमध्ये देवाणघेवाण झाली होती. हैदराबाद स्फोटांच्या संपूर्ण कटाची आखणी आणि नियोजन करण्यासाठी या स्फोटांमागील आरोपी मोहम्मद अहमद सिद्दीबापा आणि इंडियन मुजाहिदीन संघटनेचा म्होरक्या रियाझ भटकळ यांनी अशाप्रकारच्या मेसेजेसचा वापर केला होता. त्यांच्यातील हे संभाषण अनेक आठवडे सुरू होते. मात्र, भारतीय गुप्तचर यंत्रणांना वेळीच या सगळ्याचा माग काढण्यात अपयश आल्यामुळे हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात दहशतवादी यशस्वी ठरले.
या डिजिटल संभाषणांचा माग काढण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणेने २००९ साली तब्बल १०० कोटी रूपये खर्च करून विशेष हेरगिरी यंत्रणा उभारली. मात्र, त्यानंतर देशात झालेले दहशतवादी हल्ले पाहता, ही यंत्रणा पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसून आले. मुंबईत झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा भविष्यात अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यानुसार, फुटीरतावादी आणि जिहादी चळवळींशी संबंधित महाराष्ट्र आणि काश्मीरमधील काही नागरिकांच्या संभाषणावर गुप्तचर खात्याकडून पाळत ठेवण्यात येत आहे. तसेच लष्करे तैय्यबा या दहशतवादी संघटनेकडून वेळोवेळी त्यांच्या हस्तकांना देण्यात येणाऱ्या आदेशांची माहिती मिळविण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील आहेत. अनेकदा सांकेतिक पद्धतीने चालणारी ही डिजिटल संभाषणे हस्तगत करण्यात गुप्तचर खात्याला यश येते. मात्र, या सांकेतिक संदेशांची उकल करण्यासाठी लागणारी ‘डिजिटल एनक्रिप्शन यंत्रणा’ भारताकडे नसल्याने सगळी मेहनत वाया जाते. दहशवाद्यांमध्ये चालणाऱ्या सांकेतिक संभाषणांची उकल करण्यात आतापर्यंत एकदाही भारतीय गुप्तचर यंत्रणांना यश मिळाले नसल्याची कबुली खुद्द रॉ संघटनेतील वरिष्ठ पातळीवर एका अधिकाऱ्याने दिली.