भारताच्या आशा पुन्हा पल्लवित

अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व चीनच्या हेकेखोरपणामुळे भारताला मिळाले नसले तरी अजून आशा संपल्या नसून या गटाची बैठक पुन्हा वर्षअखेरीस होणार आहे. भारताने अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही या कारणास्तव चीनने भारताला सदस्यत्वास विरोध केला होता. भारताला सदस्यत्व देण्यास अमेरिकेचा भक्कम पाठिंबा असूनही चीनमुळे ते मिळाले नाही. भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी मात्र पंतप्रधान मोदी यांनी एनएसजी सदस्यत्वासाठी आग्रही भूमिका घ्यायला नको होती कारण त्याची भारताला गरज नाही अशी टीका केली आहे. त्यांनी असे सांगितले की, भारताला हे सदस्यत्व मिळून काही फायदा नाही. जे मिळायचे ते भारताला आधीच मिळालेले नाही. त्यामुळे हे सदस्यत्व मिळवण्यात कमावण्यासारखे व गमावण्यासारखे काही नव्हते.

सोल येथे एनएसजी गटाची बैठक झाली होती त्यात अखेरच्या क्षणी चीन व इतर १० देशांनी भारताला एनपीटीच्या मुद्दय़ावर विरोध करून सदस्यत्व नाकारण्यास भाग पाडले होते. पण आता एनएसजीची बैठक वर्षअखेरीस पुन्हा होणार आहे. राजनैतिक सूत्रांनी सांगितले की मेक्सिकोच्या सूचनेनुसार एनएसजीची बैठक पुन्हा घेतली जाणार आहे. त्यात एनपीटी करारावर स्वाक्षरीच्या निकषावर विचार केला जाईल. या बैठकीत सदस्यत्वावर निर्णय होईल असे नाही पण पुढील वर्षी होणाऱ्या बैठकीत नक्कीच हा निर्णय होऊ शकेल कारण एनपीटीचा मुद्दा पुरेसा स्पष्ट झालेला असेल. एनएसजीची बैठक पुढील काही महिन्यात होऊ शकते असे परराष्ट्र प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले असून आम्ही चीनला समजावण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एनएसजीमधील विरोधाचा दोन्ही देशातील संबंधावर वाईट परिणाम होणार नाही असे म्हटले आहे. पुन्हा बैठक घेण्याच्या मेक्सिकोच्या सूचनेला चीनने विरोध केला तरी अमेरिकेसह अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे.