पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय लष्कराची कारवाई; सात अतिरेकी तळ उद्ध्वस्त; ४० दहशतवादी ठार?

विविध मार्गानी दहशतवाद पोसून भारताच्या सातत्याने कुरापती काढणाऱ्या, भारतात घातपात घडवणाऱ्या पाकिस्तानला भारताने अखेर थेट मैदानात उतरून धडा शिकवला. आजवर कायम संयम बाळगणाऱ्या लष्कराच्या विशेष कमांडो दलाने बुधवारी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडत, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले आणि उरी येथील लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा हिशेब चुकता केला. सुमारे पाच तासांच्या या लक्ष्यभेदी कारवाईत किमान ४० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान पुरता हादरला आहे.

उरी येथील भारताच्या लष्करी तळावर १८ सप्टेंबरच्या पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभर संताप उसळला. पाकला धडा शिकवणारी कारवाई करावी, अशी तीव्र भावना व्यक्त झाली. अशी कारवाई भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री केली. लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पाकिस्तानव्याप्त काश्मिरातून अनेक दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असून देशातील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले चढविण्याचा त्यांचा कट आहे, अशी खबर मिळाल्यावरून लष्कराने वेगाने ही कारवाई केली. या कारवाईनंतर मी पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांशी बोललो असून त्यांना माहिती दिली आहे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे हे तळ नियंत्रण रेषेपासून दोन ते तीन किलोमीटर आत होते. त्यांच्यावर गेला आठवडाभर लष्कराची नजर होती. तेथे दहशतवादी मोठय़ा प्रमाणात जमत असल्याची खबर मिळाल्यानंतर ही कारवाई आखली गेली. हेलिकॉप्टरने लष्कराचे कमांडो काही अंतर गेले. त्यानंतर जमिनीवरून पुढे जात तीन गटांत त्यांनी सात तळांवर हल्ले चढविले. यावेळी मोठी चकमक झडली, मात्र भारतीय बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले.

पाकिस्तानचे दावे

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केलेली नाही, सीमेवर गोळीबार केला व त्यात आमचे दोन सैनिक मारले गेले, असा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यासाठी भारताचे पाकमधील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना पाकच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी बोलावून त्यांच्याकडे निषेध नोंदवला. त्याचवेळी, पाकच्या कारवाईत भारताचे आठ जवान मारले गेल्याचे पाकमधील काही प्रसारमाध्यमांनी म्हटले असले तरी हे वृत्त निखालस खोटे आहे, असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.

उरीचा हल्ला ही शेवटची काडी ठरली

  • नवी दिल्ली : ‘उरीचा हल्ला म्हणजे उंटावरची काडी होती. तो झाल्यानंतर पंतप्रधानांनी मनोमन ठरवले होते, की बस्स, म्हणजे बस्स..! त्यामुळेच हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी घेतलेल्या बैठकीतच त्यांनी लष्कराला सीमापार घुसण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता,’ असा दावा संरक्षण खात्यातील अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून करण्यात आला. उरीनंतर पेटून लगेच हल्ला करता आला असता. लष्करही तयारीत होते. परंतु पाकिस्तान सावध होता. त्याचवेळी माध्यमांमध्ये अतिरंजित वार्ताकने येत होती. त्यामुळे आम्हाला थोडे थांबावे लागले, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्राच्या सैनिकाला पकडल्याचा दावा

  • इस्लामाबाद : टट्टापानी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारानंतर उडालेल्या चकमकीत आठ भारतीय सैनिक मारल्याचा तसेच महाराष्ट्रातील एका सैनिकाला पकडल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. भारतीय सैनिकांचे मृतदेह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच पडून असून गोळीबाराच्या भीतीने भारतीय सैनिकांनी आपल्या सहकाऱ्यांचे हे मृतदेह अद्याप नेलेले नाहीत, असे वृत्त ‘डॉन’ या पाकिस्तानातील प्रतिष्ठित वृत्तपत्राने दिले आहे. पकडला गेलेला सैनिक हा चंदू बाबूलाल चौहान असून तो २२ वर्षांचा आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. अर्थात याबाबत पाकिस्तानी लष्कराकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

भांबावलेल्या पाककडून निषेध

  • इस्लामाबाद : भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरात घुसत केलेल्या कारवाईने भांबावलेल्या पाकिस्तानला सुरुवातीला काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नव्हते. हळूहळू परिस्थितीचे आकलन झाल्यावर पाकने पहिली प्रतिक्रिया दिली की, अशी कारवाईच झालेली नाही. संध्याकाळपर्यंत मात्र पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचा निषेध करीत आणि पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाची ग्वाही देत या कारवाईला एकप्रकारे दुजोराच दिला. त्यानंतर तर भारतीय सैनिकच मारले गेल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला. शरीफ यांनी दिवसभर लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी अनेक बैठकाही घेतल्या.

खबरदारीचे उपाय..

  • पाकिस्तान हद्दीपासून १० किलोमीटरच्या टापूत असलेल्या पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमधील गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. या भागांतील सर्व शाळा बेमुदत बंद.
  • अट्टारी-वाघा सीमेवरील ‘बीटिंग रीट्रीट’मधील जनतेचा सहभाग गुरुवारपुरता बंद.
  • सीमा सुरक्षा दलाचा अतिदक्षतेचा इशारा.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य राष्ट्रांसह २५ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांना कारवाईची माहिती दिली.
  • गुजरात आणि महाराष्ट्रातही दक्षतेचा आदेश. सागरी किनाऱ्यांवर बंदोबस्त आणि टेहळणीत वाढ.

उरी येथील लष्करी तळावर ज्यांनी हल्ला केला त्यांची गय केली जाणार नाही.  नरेंद्र मोदी, १८ सप्टेंबर

 

२९ सप्टेंबर २०१६ कारवाई अशी..

  • जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे भारतात हल्ला करण्याच्या उद्देशाने दहशतवादी गोळा झाल्याची खात्रीशीर गुप्त माहिती भारतीय सेनादलांना मिळाली.
  • त्याच्या आधारावर बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मर्यादित लष्करी कारवाई करण्यात आली.
  • कमांडो पथकांनी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या वेळेत नियंत्रण रेषेपलीकडे ५०० मीटर ते ३ किलोमीटर आत जाऊन दहशतवादी तळांवर हल्ला चढवला.
  • भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा विभागात सहा ते सात तळांवर हल्ला
  • कमांडोंना हेलिकॉप्टरमधून नियंत्रण रेषेपलीकडे उतरवण्यात आले.
  • कारवाईत दहशतवाद्यांचे मोठे नुकसान
  • मर्यादित लक्ष्यपूर्तीनंतर कमांडो परतले आणि कारवाई थांबवली.
  • आणखी हल्ल्यांची योजना नसल्याचे लष्करातर्फे जाहीर
  • पाकिस्तानकडून एका भारतीय जवानाला अटक. मात्र हा जवान या मोहिमेत नव्हता, असा भारतीय लष्कराचा खुलासा आणि एकप्रकारे अटकेला दुजोरा.