भारत-पाकिस्तान सीमेवर सर्वांत उंचीवर उभारण्यात आलेला आणि देशाच्या सन्मानाचे प्रतिक असलेला राष्ट्रध्वज गेल्या तीन महिन्यांपासून गायब होता. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तो पुन्हा फडकवण्यात आला आहे. ३६० फुट उंच खांबावर हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. पाकिस्तानातील लाहोर येथूनही तो दिसतो.


भारताचा हा राष्ट्रध्वजाचे मोठा गाजावाजा करीत उद्घाटन करण्यात आले होते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तो गायब होता. जास्त उंचीवर असल्याने राष्ट्रध्वज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे फाटत चालला होता. त्यामुळे हा राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याने अमृतसर जिल्हा प्रशासनाने यावर्षी एप्रिल महिन्यांत तो उतरवून ठेवला होता. दरम्यान, एका दिवसासाठी का होईना १५ ऑगस्टला राष्ट्रध्वज या ठिकाणी जरूर फडकावण्यात येईल, असे नुकतेच अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह यांनी सांगितले होते. त्यानुसार राष्ट्रध्वज पुन्हा फडकवण्यात आला आहे.

आठवड्याभरापूर्वी अमृतसरचे उपायुक्त कमलदीप सिंह संघा यांनी पंजाबच्या गृह विभाग आणि नगरविकास मंत्रालयाला एक पत्र लिहून सांगितले होते की, पाकिस्तानातून दिसणारा राष्ट्रध्वज फाटल्यामुळे देशाची बदनामी होते. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकार सध्या इतक्या उंचीवर लावण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला फाटण्यापासून बचावासाठी उपाय शोधण्यात येत आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर मार्च २०१७ मध्ये देशातील हा सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज लावण्यात आला. अटारी व्यतिरिक्त अमृतसरच्या रंजीत एव्हेन्यूवर देखील १७० फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. या झेंड्याच्या देखभालीची जबाबदारी अमृतसरच्या इम्प्रूवमेंट ट्रस्टची आहे. अटारी सीमेवर ३६० फूट उंचीवर लावण्यात आलेला हा राष्ट्रध्वज आत्तापर्यंत तीनदा फाटला आहे. त्याचबरोबर रंजीत अव्हेन्यूवरील झेंड्यासाठी आत्तापर्यंत ९ लाख रुपये तर अटारी येथील ध्वजासाठी ६ लाख रुपये खर्च झाले आहेत.