पाकिस्तानचे ‘टेररिस्तान’ झाले आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी दूतावासाच्या प्रथम सचिव एनम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तानला ठणकावले. त्यानंतर त्यांचे सोशल मीडियावर कौतुक झाले. पाकिस्तान स्वतःच दहशतवादाचा बळी पडला आहे असे सांगून भारत आमच्या देशात दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप करणारे पाकिस्तानचे  पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या भूमीतून दहशतवादी कारवाया होत आहेत, असे सांगून त्यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला.

‘काश्मिरींवर भारतात अन्याय होतो. त्यामुळे या प्रश्नी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप हवा’ असे पाकिस्तानचे पंतप्रधान अब्बासी म्हणाले होते. त्याला सडेतोड उत्तर देताना पराभूत झालेल्या देशाने मानवाधिकार आणि लोकशाहीचे धडे जगाला देऊ नयेत, असे खडे बोल गंभीर यांनी सुनावले होते. एनम गंभीर यांनी याआधी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही अशाच प्रकारे उत्तर दिले होते. शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर ”भारतातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या तक्षशिलेच्या भूमीवर आता दहशतवाद शिकवला जातो आणि पाकिस्तानची भूमिका दहशतवादाला पायघड्या घालणारी आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले होते. संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला ठणकावणाऱ्या गंभीर कोण आहेत, याविषयी जाणून घेऊयात!

कोण आहेत एनम गंभीर?

एनम गंभीर या मूळच्या दिल्लीच्या आहेत.

दिल्ली विद्यापीठातून त्यांनी २००५ मध्ये पदवीचे शिक्षण घेतले.

माद्रिद आणि स्पेनमध्येही त्यांनी काही काळ वास्तव्य केले आहे. त्यामुळे स्पॅनिश भाषाही त्यांना चांगलीच अवगत आहे.

न्यूयॉर्कमधील भारताच्या स्थायी दूतावासाच्या प्रथम सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली

ब्राझिल आणि अर्जेंटीना या देशांमध्ये त्यांनी वास्तव्य केले आहे.

संयुक्त राष्ट्र संघात भारताची भूमिका मांडण्याचे काम एनएम गंभीर यांच्याकडे असते.