केंद्र सरकारने कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणाला मंजुरी दिल्यानंतर आता अनेक स्पर्धक कंपन्या एअर इंडियातील हिस्सा विकत घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये हवाई क्षेत्रातील इंडिगो कंपनी सर्वाधिक उत्सुक असल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव राजीव चौबे यांनी ‘इंडिगो’ एअर इंडियातील हिस्सा खरेदी करण्यासाठी इच्छूक असल्याचे म्हटले. यासाठीचा अधिकृत प्रस्ताव अद्याप सरकारकडे आला नसला तरी पडद्यामागच्या घडामोडींना वेग घेतला आहे. इंडिगोच्या मालक कंपनीकडून यासंदर्भात सरकारशी पत्रव्यवहार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रव्यवहारात इंडिगोने केवळ हिस्सेदारीच नव्हे तर संपूर्ण एअर इंडिया कंपनी विकत घेण्याची तयारीही दर्शवल्याचे समजते. याशिवाय, स्पाईस जेट ही हवाई कंपनीही एअर इंडिया विकत घेण्यासाठी शर्यतीत असल्याचे वृत्त आहे.

टाटा समूहानेही यापूर्वीच एअर इंडियाला विकत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा समूहाने एअर इंडिया विकत घेतल्यास या कंपनीला पुन्हा एकदा टाटांचे पाठबळ मिळणार आहे. १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण होण्यापूर्वी ही कंपनी टाटा समुहाच्याच मालकीची होती. टाटा समुहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सरकारसोबत अनौपचारिक चर्चा सुरु केल्याचे वृत्त ‘ईटी नाऊ’ने दिले होते. एअर इंडियामध्ये टाटा समुहाचे ५१ टक्के शेअर्स असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारलाही एअर इंडियाच्या वास्तवाची जाणीव असून टाटा समुहाने दिलेल्या प्रस्तावावर सरकारही अनुकूल असल्याचे समजते.

एअर इंडियाचे खासगीकरण हा भांडवलदारांना खूश करण्यासाठीचा डाव – काँग्रेस

एअर इंडियाला पांढरा हत्ती म्हणून म्हटले जाते. एअर इंडियावर सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय ४ हजार कोटींचा व्याजाचा बोजादेखील आहे. गेल्या १० वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात असून अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनीदेखील एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते.

एअर इंडियाचे सहा महिन्यात खासगीकरण