मुंबईहून दिल्लीला जाणारे ‘इंडिगो’ कंपनीचे एक विमान दिल्ली विमानतळावर उतरत असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने काळा धूर येऊ लागला. परिणामी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्याच्या प्रयत्नात २८ प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
इंडिगोचे ६ई-१७६ हे ‘एअरबस-३२०’ जातीचे विमान १४८ प्रवाशांना घेऊन मुंबईहून दिल्लीला येत होते. दुपारी ३.३० वाजता विमान धावपट्टीवर उतरले. मात्र त्याचवेळी विमानाच्या डाव्या बाजूला खालून गडद काळ्या रंगाचा धूर येऊ लागला. विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकाने तातडीने हा प्रकार वैमानिकाला कळवला. विमान तातडीने बाजूला वळवण्यात आले आणि प्रवाशांना आपत्कालीन दरवाजांतून बाहेर काढण्यात आले. प्रवाशांना बाहेर काढताना एका प्रवाशाला फ्रॅक्चर झाले, तर इतरांना किरकोळ जखमा झाल्याचे विमानतळावरील सूत्रांनी सांगितले.
हवाई वाहतूक महासंचालक आणि इंडिगो कंपनीकडून या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विमानाच्या डाव्या बाजूच्या चाकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घर्षण झाल्याने हा धूर आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
इंडिगोच्या विमानासंदर्भात गेल्या पाच महिन्यांत दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. गेल्या ८ मार्च रोजी इंडिगोचे विमान काठमांडू विमानतळावर उतरल्यावर अशाच प्रकारे त्यात आग लागली होती. विमानात तेव्हा १८२ प्रवासी होते. तेव्हाही विमानाच्या चाकातच आग लागली होती.