‘हार्ट ऑफ आशिया’ परिषदेनिमित्त दिल्लीत भेट; पुन्हा संवादाचा मार्ग खुला

भारत आणि पाकिस्तान यांच्या परराष्ट्र सचिवांची मंगळवारी नवी दिल्लीत होणाऱ्या ‘हार्ट ऑफ आशिया’ परिषदेच्या निमित्ताने भेट होत असून पठाणकोट हल्ल्यानंतर दोन्ही देशांत आलेली कटुता दूर होऊन संबंध सुरळीत होण्याच्या मार्गावरील एक पाऊल म्हणून या चर्चेकडे पाहिले जात आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ अहमद चौधरी ‘हार्ट ऑफ आशिया’ परिषदेसाठी मंगळवारी दिल्लीत उपस्थित राहणार असून त्यावेळी भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याशी त्यांची भेट होणार आहे. दोन्ही देशातील चर्चा पठाणकोट येथील हल्ल्यानंतर फिसकटली असताना आता पुन्हा संवादाचा मार्ग खुला होत आहे. पठाणकोट हल्ला पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घडवला होता असा भारताचा आरोप आहे. दोन्ही सचिवांच्या भेटीत पठाणकोट हल्ला व  एनआयए पथकाची पाकिस्तानला संभाव्य भेट यावर चर्चा होईल. जानेवरीत हा हल्ला झाल्यानंतर मार्चमध्ये नेपाळमध्ये झालेल्या सार्क देशांच्या परिषदेत भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांमध्ये अनौपचारिक आणि जुजबी बोलणी झाली होती. त्यानंतर प्रथमच आता अधिकृत चर्चा होत आहे.

अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये सुरक्षा, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देश्याने ‘हार्ट ऑफ आशिया – इस्तंबूल प्रोसेस’ या संयुक्त व्यासपीठाची नोव्हेंबर २०११ मध्ये तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे स्थापना झाली होती. त्यात अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, भारत, इराण, कझाकस्तान, पाकिस्तान, किरगिझस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकीस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा सदस्य म्हणून समावेश आहे. या गटाच्या आजवर इस्तंबूल, काबुल, अलमाटी, बीजिंग आणि इस्लामाबाद येथे पाच बैठका झाल्या असून सहावी बैठक नवी दिल्लीत होत आहे.

पाकिस्तानी शिष्टमंडळ भारतासह अन्य देशांच्या शिष्टमंडळांशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या मते ‘हार्ट ऑफ आशिया’ परिषदेच्या निमित्ताने अफगाणिस्तानात स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने वचनबद्धता व्यक्त केली जाईल.