भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे सध्याच्या घडीला सर्वात धोकादायक बनली असल्याची स्पष्टोक्ती माजी अमेरिकी परराष्ट्रमंत्री आणि राजनैतिक अधिकारी जॉर्ज शुल्ट्झ यांनी येथे दिली. अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या कालावधीमध्ये परराष्ट्रमंत्रीपद भूषविलेल्या शुल्ट्झ यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अभ्यासगटासमोर बोलताना आपले मत व्यक्त केले.
मूलतत्त्ववादी गटांकडून यापुढेही मुंबईसारखा भीषण हल्ला होऊ शकतो आणि भारत यापुढेही अशा हल्ल्यांना थोपविण्यामध्ये अपयशी होऊ शकतो, असे भाकीत कुणीही करू शकतो. अचानकपणे या भागांतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि दोन्ही राष्ट्रे काश्मीर प्रश्नासंदर्भात एकमेकांशी लढू शकतात, असे शुल्ट्झ यांनी अभ्यासगटापुढे म्हटले.
अण्वस्रांच्या गैरवापराबाबत चर्चा सुरू असताना शुल्ट्झ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात भाष्य केले. सध्याची परिस्थिती अत्यंत भीषण असून, इराणला जर अण्वस्त्रे मिळाली तर त्यांचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ शकतो, याबाबत चिंता व्यक्त करून, ओबामांच्या अण्वस्त्र सुरक्षा भूमिकेचे शुल्ट्झ यांनी कौतुक केले.

२६/११ हल्ल्याबाबत पाक शिष्टमंडळ भारतात येणार
२६/११च्या हल्ल्याप्रकरणी चार भारतीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उलटचौकशीसाठी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानचे विधि शिष्टमंडळ दुसऱ्यांदा भारत भेटीवर येणार आहे. याबाबत भारताने हिरवा कंदील दिल्यानंतर तातडीने हे शिष्टमंडळ भारताकडे रवाना होण्यासाठी सज्ज झाल्याचे, रेहमान मलिक यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यामध्ये हा दौरा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये शिष्टमंडळ भारतात येऊन गेले होते. मात्र त्यांनी सादर केलेला अहवाल पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने रद्द केला. त्यांनी मांडलेल्या अहवालामध्ये चार भारतीय अधिकाऱ्यांची उलटतपासणी राहून गेल्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील प्रमुख संशयित झाकिर रेहमान लखवी याच्यासह सात जणांवर खटला भरता येऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.