इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांच्या उत्तरेकडील भागाला बुधवारी सकाळी ६.४ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपामुळे या भागात अनेक इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. अनेकजण कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. सुदैवाने या भूकंपामुळे त्सुनामीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही.

अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानुसार इंडोनेशियातील रेउलेउएटपासून १० किलोमीटर उत्तरेला असणाऱ्या परिसरात हा भूकंप झाला. स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी या भागाला भूकंपाचे हादरे बसले. ‘रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही लहान मुलांचादेखील समावेश आहे,’ अशी माहिती भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पीडी जयाचे जिल्हाप्रमुख सैद मुलयादी यांनी दिली आहे.

‘पहाटेच्यावेळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी मुस्लिमबहुल भागातील बहुतांश लोक नमाजाची तयारी करत होते. मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. भूकंपामुळे इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मशिदी, दुकाने आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे,’ अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इंडोनेशियामधील असेह प्रांताला २००४ मध्ये भूकंपाचा तीव्र झटका बसला होता. या भूकंपाची तीव्रता तब्बल ९.२ रिश्टर स्केल इतकी होती. यामुळे आलेल्या त्सुनामीने या भागाचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. या त्सुनामीमुळे इंडोनेशियातील १ लाख ७० हजार लोकांना जीव गमवावा लागला. याशिवाय हिंदी महासागराशेजारील अनेक देशांना त्सुनामीचा फटका बसला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला होता.