इंडोनेशियाच्या सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पोकेमॉन गो नावाचा गेम खेळू नये असा आदेश काढण्यात आला आहे. देशात स्मार्टफोन गेम्सविरोधात आधीच वातावरण तापलेले असताना देशाची गुपिते उघड होऊ नयेत म्हणून हा आदेश काढण्यात आला आहे.

अधिकारी वर्तुळात पोकेमॉन गो या गेमला विरोध वाढत आहे. लष्कर व पोलिसांनी त्यांच्या जवानांना हा गेम खेळण्यावर बंदी घातली आहे. आभासी राक्षस किंवा वेताळांना शोधण्याचे उद्योग कामावर असताना करू नयेत असे सांगण्यात आले. जाकार्ता येथील राजप्रासादाने म्हटले आहे की, त्यांच्या आवारात पोकेमॉन गो हा खेळ खेळता येणार नाही. सुरक्षा संस्थेच्या उच्च पदस्थांनी हा गेम उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून त्यामुळे परदेशी हेरांना देशातील संवेदनशील ठिकाणे कळू शकतात असे म्हटले आहे. सुरक्षा तज्ज्ञांमध्ये मात्र याबाबत मतभेद आहेत. एका फ्रेंच व्यक्तीला इंडोनेशियाच्या लष्करी तळावर राक्षस किंवा वेताळ शोधण्याचा पोकेमॉन गो हा खेळ खेळताना ताब्यात घेतले होते. नोकरशाही सुधारणा मंत्री युडी ख्रिसनँडी यांनी सांगितले की, सर्व सरकारी कार्यालयांना पत्र पाठवले असून पोकेमॉन गो खेळावर बंदी घालण्यात यावी, त्यात गुप्तचर खात्याचाही समावेश आहे. देशात ४५ लाख सरकारी कर्मचारी असून त्याना उद्देशून हा आदेश संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे. देशाची स्थिरता व सुरक्षितता आम्हाला धोक्यात आणायची नाही असे प्रवक्त्याने सांगितले. इंडोनेशियात पोकेमॉन गो खेळाचे वेड वाढले असून दोन आठवडय़ांपूर्वी तो जगात उपलब्ध झाला आहे. स्मार्टफोन घेऊन लोक रस्त्यावर राक्षस किंवा वेताळांना शोधत आहेत. या गेमचे अनधिकृत डाउनलोडिंग करण्यात आले किंवा काय हे अजून समजलेले नाही.