इंडोनेशियातील जकार्ता शहर बुधवारी संध्याकाळी बॉम्बस्फोटाच्या आवाजाने हादरले. पूर्व जकार्तामधील काम्पूग मलय बस डेपोमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले असून या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटात अनेकजण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पूर्व जकार्तामध्ये काम्पूग मलय येथे बस डेपोमध्ये संध्याकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. आत्मघातकी हल्लेखोराने हा स्फोट घडवला. या स्फोटात हल्लेखोराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. हल्लेखोरांची नेमकी संख्या किती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस डेपोचा परिसर वर्दळ जास्त असल्याने स्फोटानंतर परिसरात गोंधळाची स्थिती होती. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात नेले जात आहे. जखमींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे समजते.

जकार्तामधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बस डेपोतील पोलीस चौकीला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ५ ते १० मिनिटांच्या अंतराने बॉम्बस्फोटांचे आवाज आले. स्फोटानंतर पोलिसांनी बस डेपोचा परिसर रिकामा केला असून घटनास्थळाची कसून तपासणी केली जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.