इंडोनेशियाची राजधानी जकार्ता गुरुवारी सकाळी साखळी बॉम्बस्फोटाने हादरले. शहराच्या मध्यवर्ती भागात घुसलेल्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस आणि दहशतवादी यांच्यात सुरू असलेली धुमश्चक्री संपुष्टात आली असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांचे प्रवक्ते कर्नल मोहम्मद इक्बाल यांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून, चार दहशतवादी स्फोटामध्ये मारले गेले आहेत, असेही इक्बाल यांनी स्पष्ट केले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने आतापर्यंत घेतलेली नसली, तरी इस्लामिक स्टेटकडून हा हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जकार्तामधील मध्यवर्ती भागात असलेले संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय, मॉल, मल्टिप्लेक्स येथे हे स्फोट घडवून आणण्यात आले. स्टार बक्स कॅफेमध्ये पहिला स्फोट घडवून आणण्यात आला. त्यानंतर इतर ठिकाणी लागोपाठ स्फोट झाले. जकार्तामधील स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास स्फोट झाले. अनेक लोक कामासाठी कार्यालयात जात असताना गर्दीच्यावेळी स्फोट झाल्याने त्याचा परिणाम जास्त झाला. पोलिसांनी स्फोट झालेली ठिकाणी मोकळी केली असून, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला सर्व बाजूंनी घेरण्यात आले होते. दहशतवाद्यांकडून पोलिसांच्या दिशेने हॅण्डग्रेनेड फेकण्यात आले. त्यामुळे पोलिसांना प्रत्युत्तर देण्यास वेळ लागल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या हल्ल्यानंतर शहरातील बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. नागरिकांना घरातच थांबण्याची सूचना सरकारी वाहिनीवरून करण्यात आली असून, मॉल, मल्टिप्लेक्समध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.