इंडोनेशियात १६ जणांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाचा आज, शनिवारी बातम बेटाजवळ संपर्क तुटला आहे, अशी माहिती चीनच्या सिन्हुआ न्यूजने दिले आहे.  हे विमान इंडोनेशियाच्या पोलिसांचे असल्याची माहिती मिळते. इंडोनेशियाच्या नौदलाने शोधमोहिम सुरू केली असून, नौदलाने तीन बोटी आणि दोन गस्तीनौका तैनात केल्या आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर हे विमान कोसळल्याचे वृत्त ‘स्ट्रेट्सटाइम्स’ने दिले आहे.

स्थानिक वेळेनुसार, सकाळी साडेअकराच्या सुमारास एम-२८ स्कायट्रक या विमानाचे अवशेष रिआऊ बेटाच्या परिसरात पुलाऊ सेनयांग येथे एका मच्छिमाराला आढळून आले, असेही या वृत्तात म्हटले आहे. या विमानात इंडोनेशियन पोलीस अधिकाऱ्यांसह विमानातील क्रू मेम्बर होते. इंडोनेशियन पोलिसांचे विमानाचा सकाळी ११.२२ वाजता (स्थानिक वेळेनुसार) संपर्क तुटला, अशी माहिती सिंगापूरच्या नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने दिली आहे. सिंगापूर बचाव समन्वयक केंद्राने इतर व्यवस्थापनांच्या मदतीने शोध आणि बचावकार्य हाती घेतले आहे.

बातम बेटाजवळ विमान आले असता, त्याचा रडारवरील संपर्क तुटला, अशी माहिती तानजुंग पिनांग नेव्हल बेसचे कमांडर अॅडमिरल एस. ईरावान यांनी सांगितले. विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापूर्वी स्फोटाचा मोठा आवाज ऐकल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, इंडोनेशियाच्या नौदलाने शोध आणि बचावकार्यासाठी तीन बोटी आणि दोन गस्तीनौका तैनात केल्या आहेत.