भारतात पाकिस्तानचा ध्वज फडकावणे तसेच देशविरोधी घोषणाबाजी करणे इस्लामविरोधी असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात अनेक मुस्लीम विद्वानांशी बोललो असून, देशावर प्रेम करणे, गरज भासल्यास देशासाठी प्राण द्यावेत, अशी शिकवण इस्लाम देते. त्यामुळे भारत विरोधी घोषणा या इस्लामविरोधी आहेत, असे इंद्रेशकुमार यांनी स्पष्ट केले. इंद्रेशकुमार मुस्लीम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक आहेत. येथे राष्ट्रीय सुरक्षेबाबत कार्यक्रमात त्यांनी भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यांना फासावर लटकवा, तुरुंगात टाका नव्हे तर जो देश त्यांना आवडतो तिकडे पाठवा, अशी मागणी इंद्रेशकुमार यांनी केली. त्यांचे या देशावर प्रेम नसेल, त्यांना येथे राहायचे नसेल तर त्यांना या देशात राहू देऊ नये अशी सूचना त्यांनी केली. श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांनी एका कार्यक्रमात भारतविरोधी घोषणाबाजी केली त्या पाश्र्वभूमीवर हे मत महत्त्वाचे आहे.