योगगुरू रामदेवबाबा यांच्या रामदेव फार्मसीने वंध्यत्व निवारण व पुत्रप्राप्तीसाठी तयार केलेल्या औषधाबाबत उत्तराखंड सरकारने नेमलेल्या चौकशीचा अहवाल रामदेव फार्मसीच्या विरोधात गेला आहे.
रामदेव फार्मसीने पुत्रसंजीवक बीज नावाने पुत्रप्राप्तीसाठी औषध तयार केले होते त्यावर राज्य सरकारने तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. त्याबाबतचा अहवाल उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना सादर करण्यात आला असून नंतर तो केंद्र सरकारला पाठवला जाईल असे राज्याचे आरोग्य सचिव ओम प्रकाश यांनी सांगितले.
राज्यसभेतील जनता दल संयुक्तचे खासदार के. सी. त्यागी यांच्यासह काही खासदारांनी १ मे रोजी या औषधावर वाद झाल्यामुळे बंदीची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने उत्तराखंड सरकारला चौकशी समिती नेमण्यास सांगितले होते.
रामदेव यांनी हे पुत्रप्राप्तीचे औषध नसून वंध्यत्व निवारणाचे औषध असल्याचा दावा केला आहे. आयुषचे औषध नियंत्रक पी. डी. चामोली यांच्या नेतृत्वाखाली एक समिती याआधी नेमण्यात आली होती त्यात रामदेवबाबा यांच्या या उत्पादनात आक्षेपार्ह काही नसल्याचे सांगण्यात आले होते. चामोली समितीनंतर राज्य सरकारने आरोग्य महासंचालक व कायदा खात्याला याबाबत चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते.