विशाल सिक्का यांच्यानंतर इन्फोसिस लिमिटेडकडून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी नव्या व्यक्तीचा शोध सुरु करण्यात आला आहे. या पदासाठी स्पर्धेत असणाऱ्या उमेदवारांना कठोर निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पदासाठीच्या व्यक्तीला २ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश असणाऱ्या देशातील आघाडीच्या इन्फोसिसला सांभाळण्याची क्षमता असावी लागणार आहे. आऊटसोर्सिंग क्षेत्रातील अप्रत्यक्ष बदलांना सामोरे जाण्याची आणि इन्फोसिसमधील सध्या सुरु असलेल्या संचालक मंडळ आणि सहसंस्थापकांमधील शीतयुद्धाशी धीटपणे लढण्याची क्षमताही त्याच्या अंगी असावी लागणार आहे.

इन्फोसिसचे पहिले संस्थापक नसलेले सीईओ विशाल सिक्का यांनी शुक्रवारी आपल्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. संस्थापकांच्या सततच्या टीकेला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे सिक्का यांचे म्हणणे आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने सिक्का यांच्या राजीनाम्यासाठी इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांना जबाबदार धरले आहे. त्यानंतर याप्रकरणी आता कंपनीने ३१ मार्च २०१६ पर्यंत सिक्का यांचा उत्तराधिकारी शोधण्यात येईल असे सांगितले आहे. सीईओ पदासाठी इन्फोसिसमधील आणि कंपनीबाहेरच्या योग्य व्यक्तीचा शोध घेतला जाणार आहे.

मात्र, बाहेरच्या व्यक्तीसाठी इन्फोसिसचे सीईओपद मिळवणे सोपे असणार नाही. यासाठी कंपनीतीलच सक्षम व्यक्तीची या महत्वाच्या पदासाठी निवड होण्याची जास्त शक्यता आहे. बंगळूरू येथे मुख्यालय असलेली इन्फोसिस देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आऊटसोर्सिंग कंपनी आहे. यातून कंपनी वर्षाकाठी १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त महसूल कमावते. मात्र, कंपनी सध्या अनेक व्यावसायिक आव्हानांचा सामना करत आहे. यामध्ये कंपनीच्या वाढीचा वेग मंदावला आहे. कंपनीच्या या अधोगतीला जबाबदार धरतच सिक्का यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मात्र, असे असले तरी विशाल सिक्का यांच्या तोडीची व्यक्ती नवा सीईओ म्हणून मिळणे हे खरोखरच खूप अवघड असून कंपनीला त्यासाठी जागतिक स्तरावरील हुशार व्यक्तीचा शोध घ्यावा लागणार आहे. असे दिल्लीस्थित फोरेस्टर इनकॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख आशुतोष शर्मा यांनी म्हटले आहे.

५० वर्षीय विशाल सिक्का यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्यूटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे. तसेच ते ‘सॅप, एससी’चे माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत. इन्फोसिसला मजबूत करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. तीन वर्षांपूर्वी कंपनीची जबाबदारी स्विकारल्यांनतर इन्फोसिसच्या महसुलात २५ टक्के इतकी भरघोस वाढ मिळवून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. शुक्रवारी सिक्का यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उलथापालथ पहायला मिळाली. इन्फोसिसचे शेअर्स ९.६ टक्क्यांनी कोसळले होते.

सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी कंपनीतील आघाडीचे अधिकारी प्रविण राव यांच्याकडे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपद हंगामी स्वरूपात सोपवण्यात आले आहे.

[jwplayer jhW4ODCD]