सहा लाख कोटींची कामे सुरू असल्याचा निती आयोगाचा अहवाल

रस्ते, वीज, सिंचन आणि  वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधांचे देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असल्याचे आणि त्यासाठी जवळपास सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती केंद्र सरकारचा ‘थिंक टँक’ असलेल्या ‘निती’ आयोगाने प्रसिद्ध केली. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आदी राज्ये खूप मागे पडली असताना उत्तर प्रदेशसारखे कथित मागास आणि अरुणाचल प्रदेशसारख्या सीमावर्ती राज्याने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

‘‘देशात एकूण ८ हजार ३६७ पायाभूत प्रकल्पांची कामे चालू असून त्यांची किंमत ५० लाख ५८ हजार ७२२ कोटी इतकी आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये १०९७ प्रकल्पांची कामे चालू असून त्यांच्यासाठी तब्बल ५ लाख ९७ हजार ३१९ कोटी रुपये खर्च केले जात आहे. देशातील एकूण प्रकल्पांच्या संख्येमध्ये आणि खर्चामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. या प्रकल्पांतील गुंतवणुकीचा विचार केल्यास देशामध्ये एकटय़ा महाराष्ट्राचा हिस्सा ११.८ टक्क्यांचा आहे,’’ असे ‘निती’ आयोगाने नमूद केले. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) महाराष्ट्राचा हिस्सा जवळपास निम्मा असल्याचे आकडेवारी मध्यंतरी उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली होती. त्या पाश्र्वभूमीवर हा अहवाल आला आहे.

३० एप्रिल २०१७ पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारावर आयोगाचा निष्कर्ष बेतला आहे. या प्रकल्पांमध्ये सरकारी आणि सार्वजनिक व खासगी भागीदारी प्रकल्पांचा (पीपीपी) समावेश आहे. पाच कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांना या आकडेवारीत समाविष्ट केलेले आहे.महाराष्ट्रापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून तिथे ४५४ प्रकल्पांची कामे चालू आहेत. त्यासाठी ३ लाख ५४ हजार ४१९ कोटी रुपये गुंतविले जात आहेत. अरुणाचल प्रदेशचा क्रमांक तिसरा असून तिथे १८८ प्रकल्पांवर ३ लाख १७ हजार ३१० कोटींचा खर्च केला जात आहे. त्याचे प्रमाण देशाच्या तुलनेत ६.३ टक्के इतके होते. ़चीन सीमेवरील या लोकसंख्येच्या दृष्टीने छोटय़ा, पण अतिशय संवेदनशील असलेल्या राज्यामधील गुंतवणुकीकडे धोरणात्मक आणि व्यूहतंत्रात्मक दृष्टीने पाहावे लागेल.

औद्योगिकदृष्टय़ा प्रगत तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. काँग्रेसशासित कर्नाटक हे गुजरातच्या किंचितसे मागे आहे. तिथे २,८८,९०१ कोटी रुपयांचे ६५९ प्रकल्प चालू आहेत. ममता बॅनर्जीच्या पश्चिम बंगालची (४१३ प्रकल्प आणि १,६८,९८० कोटींची गुंतवणूक) आणि वसुंधरा शिंदे यांच्या राजस्थानची कामगिरी (४९६ प्रकल्प आणि १,७६,६९४ कोटींची गुंतणवूक) तुलनेने निराशाजनक आहे.

पहिले पाच..

राज्य           चालू प्रकल्पांचा खर्च (कोटींत)

महाराष्ट्र      ५,९७,३१९

उत्तर प्रदेश    ३,५४,४१९

अरुणाचल    ३,१७,३१०

तामिळनाडू    ३,१४,०६६

गुजरात        २,९०,२२६