भारतीय किराणा बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यासाठी अमेरिकन कंपनी वॉलमार्टने भारतात लॉबिंगवर केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या खर्चाची निवृत्त न्यायाधीशांकडून कालबद्ध पद्धतीने चौकशी करण्याची विरोधी पक्षांची मागणी यूपीए सरकारने मान्य केली आहे. लोकसभेत संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी बुधवारी ही घोषणा केली. वॉलमार्टने अमेरिकी सिनेटला दिलेल्या अहवालात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी लॉिबगवर सव्वाशे कोटी रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षांनी गेल्या दोन दिवसांपासून ठप्प केले होते. या प्रकरणाची चौकशी करायला सरकारला अजिबात संकोच नसून निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करून सभागृहापुढे शक्य तितक्या लवकर चौकशी अहवाल मांडण्यात येईल, असे  लोकसभेचे कामकाज सुरू होताच कमलनाथ यांनी जाहीर केले.
भारतीय कंपन्यांचेही लॉबिंग
वॉशिंग्टन : वॉलमार्टने केलेल्या लॉबिंगवर भारतात वादंग निर्माण झाले असताना सुमारे २७ भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत वेगवेगळय़ा कारणांसाठी ‘पैसा’ खर्च केल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाकडील नोंदीनुसार विप्रो, टाटा सन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लि., रॅनबॅक्सी लॅब अशा नामांकित कंपन्यांनी अमेरिकेतील व्हिसापासून संरक्षण बाजारपेठेपर्यंतच्या क्षेत्रांत शिरकाव करण्यासाठी तेथील लॉबिंगतज्ज्ञ कंपन्यांना शुल्क दिल्याचे दिसून आले आहे.