पाटणा : लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने नि:स्वार्थी नेतृत्वासाठी मतदान केले, मात्र जनतेला ‘सेल्फी’ नेतृत्व मिळाले, असा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नितीशकुमार यांनी सदर प्रतिक्रिया दिली.मोदी यांचे ‘सेल्फी’ मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या एकत्रित ‘सेल्फी’हून अधिक आहेत हीच एनडीएच्या एक वर्षांतील कारभारातील उल्लेखनीय बाब आहे, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

अद्याप भारत अस्वच्छच!
दिल्ली : स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा झाला तरी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनंतरही भारतातील वातावरण-नद्या प्रदूषितच आहेत. नद्यांमध्ये गटार, औद्योगिक कंपन्यांचे पाणी मिसळत आहे. तसेच १.२ अब्ज लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक आजही उघडय़ावर मलविसर्जन करत आहेत. मोदी देशात स्मार्ट शहरे, फेसाळणाऱ्या नद्या, सौर ऊर्जा व सर्वासाठी स्वच्छतागृहांची घोषणा करत आहेत. मात्र ते या सर्व कशा पूर्ण करणार हे एक न उलगडणारे कोडं बनून राहिले आहे, अशी पर्यावरणवाद्यांची टीका आहे.