बिहार विधानसभा निवडणूक आणि उत्तर प्रदेशातील दादरी हत्याप्रकरणानंतर राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सध्या गोहत्या आणि गोमांसाचा वाद चांगलाच शिगेला पोहचला आहे. याच मुद्यावरून सध्या भाजप नेत्यांमध्ये एकापेक्षा एक वादग्रस्त विधाने करण्याची अहमहिका लागली आहे. वाघाऐवजी गायीला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, अशी मागणी करून बुधवारी हरियाणाचे आरोग्य आणि क्रीडा मंत्री अनिल विज यांनी नव्या वादाला तोंड फोडले. विज यांनी ट्विटरवरून यासंबंधीचे भाष्य केले असून त्यामध्ये बंगालच्या पट्टेरी वाघाऐवजी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करायला पाहिजे, असे म्हटले आहे. विज हे हरियाणाच्या मंत्रिमंडळातील सक्रिय आणि रोखठोक निर्णय घेणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.
मार्च महिन्यात भाजप सरकारकडून हरियाणामध्ये गोमांसबंदी लागू करण्यात आली होती. या निर्णयामुळे सरकारला दिल्लीला जोडून असलेल्या गुडगावमधील जनतेचा रोष स्विकारावा लागला होता. या भागात अनेक परदेशी नागरिक वास्तव्यास असून हरियाणा सरकारच्या निर्णयामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली होती.