जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आबे यांच्या भारत दौऱ्याला कालपासून (बुधवार) सुरुवात झाली. आबेंचे गुजरातमध्ये आगमन होताच मोदींनी त्यांची गळाभेट घेत स्वागत केले. याआधीही मोदी आणि आबे यांनी अनेकदा एकमेकांची भेट घेतली आहे. मोदी पंतप्रधान होताच जगभरातील मोजक्या अध्यक्ष आणि पंतप्रधानांनी त्यांचे दूरध्वनीवरुन अभिनंदन केले होते. त्या मोजक्या नेत्यांमध्ये आबे यांचा समावेश होतो. मात्र मोदी आणि आबे यांची मैत्री काही आताची नाही, तर ती १० वर्षांहून अधिक जुनी आहे. याच मैत्रीचा परिचय मोदी आणि आबे यांच्या विमानतळावरील गळाभेटीतून आला.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांची आबे यांच्याशी मैत्री आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आबे जपानचे पंतप्रधान होते. मात्र याचा कोणताही परिणाम त्यांच्या मैत्रीवर झाला नाही. शिंजो आबे सध्या ट्विटरवर केवळ १७ जणांना फॉलो करतात. त्यामध्ये मोदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी आबे ट्विटरवर फक्त तीनच जणांचा फॉलो करायचे. त्यातही मोदींचा समावेश होता.

२०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी आल्यानंतर मोदींनी जपानला भेट दिली होती. यानंतर पुढच्याच वर्षी शिंजो आबे भारताच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी आबेंनी मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट दिली होती. त्यावेळी आबेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात हिंदीमधून केली होती. काल आबे गुजरातमध्ये दाखल होताच मोदींनी त्यांच्यासोबत रोड शो केला. याआधी मोदींनी कोणत्याही देशाच्या प्रमुखासोबत अशा प्रकारचा रोड शो केलेला नाही. यावरुन मोदी आणि आबे यांच्या मैत्रीच्या गहिऱ्या नात्याची कल्पना येऊ शकते. आबे यांनी रोड शो करताना मोदी जॅकेट परिधान केले होते, तर त्यांच्या पत्नीने सलवार घातला होता.

मोदींच्या पंतप्रधानपदाची कारकीर्द २०१२ मध्ये मोदी दुसऱ्यांदा जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. याआधी मोदींनी २००७ मध्ये जपानला भेट दिली होती. या दोन भेटीदरम्यान ५ वर्षांचे अंतर होते. मात्र तरीही दोघांमधील घट्ट मैत्री कायम राहिली. २००७ मध्ये मोदींच्या पहिल्या भेटीवेळी आबे जपानचे पंतप्रधान होते. मात्र त्यांच्या दुसऱ्या जपान दौऱ्यादरम्यान आबे सत्तेत नव्हते. मात्र तरीही याचा कोणतीही परिणाम त्यांच्या मैत्रीवर झाला नाही.