मोदी, फडणवीस आणि गडकरींवरील नाराजीतून पर्यायांची चाचपणी सुरू; लोकसभेपेक्षा विधानसभेकडे अधिक कल

शेतकरी कर्जमाफीवरून देवेंद्र फडणवीस सरकारवर फटकारे ओढणारे भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांची गेल्या काही महिन्यांपासूनची खदखद बाहेर पडल्याचे मानले जात आहे. भाजपने ‘भ्रमनिरास’ केल्याच्या भावनेने त्यांच्या मनात घर केले असून त्या नाराजीतून त्यांनी पर्यायांची चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक लढविण्याकडे त्यांचा अधिक कल असल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मंत्रिपद न मिळाल्याने झालेला अपेक्षाभंग ते त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावशाली नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात लढण्यासाठी पक्षाकडून ताकद मिळत नसल्याचे गाऱ्हाणे अशा अनेक कारणांमुळे पटोले मनोमन नाराज असल्याचे दिसतच होते. भाजप खासदारांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सर्वासमक्ष फटकारल्यापासून तर ते स्वत:च्या कोशातच गेले होते. एरवी ते मोदींबद्दल भरभरून बोलायचे, वृत्तवाहिन्यांवर पक्षाची भूमिका हिरिरीने मांडायचे; पण त्या घटनेनंतर ते पक्षापासून स्वत:ला दूर ठेवू लागले होते.

मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलची नाराजी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत असताना त्यांनी फडणवीस सरकारवर गुरुवारी कठोर टीकास्त्र सोडल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची फडणवीस सरकारची इच्छा नसल्याचा प्रहार त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला. एखाद्या भाजप खासदारानेच स्व:पक्षाच्या सरकारवर टीका करण्याचा हा पहिला प्रकार असावा.

पटोलेंच्या या नाराजीची कल्पना ‘सर्व संबंधितांना’ चांगलीच आहे. नुकत्याच सरलेल्या संसद अधिवेशनादरम्यान काही खासदारांनी त्यांना ‘समजावण्या’चा प्रयत्न केला होता. पण अखेर खदखद बाहेर पडलीच. मिळालेल्या माहितीनुसार, पटोलेंचा लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढविण्याकडे कल आहे. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) संघटन करून ‘स्वत:ची राजकीय शक्ती’ निर्माण करण्याचेही मनसुबे आहेत. मध्यंतरीच त्यांनी दिल्लीमध्ये ओबीसींच्या मागण्यांसाठी मोठे अधिवेशन घेतले होते. नाराजीची तीव्रता भाजप सोडण्याइतपत तूर्त नसली तरी विधानसभेसह ‘अन्य पर्यायां’ची चाचपणी त्यांनी यापूर्वीच चालू केल्याचे समजते. काँग्रेसचे तीनदा आमदार असलेले पटोले २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले होते आणि पाहता पाहता प्रफुल्ल पटेलांसारख्या ताकदवान नेत्याचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता. २००९मध्येही त्यांनी लोकसभा लढविली; पण अपक्ष म्हणून. तेव्हा त्यांना स्व:बळावर जवळपास दोन लाख ४० हजार मते मिळाली होती.

दूर जाता जाता..

  • मागील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची दाट खात्री होती; पण निराशा पदरी पडली.
  • इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापनेवरून सर्व खासदारांसमक्ष हुज्जत घातल्यानंतर मोदींनी त्यांना फटकारले होते. त्या ‘अपमाना’नंतर पटोले बऱ्यापैकी स्वत:च्या कोशात गेले.
  • नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीसांनी ‘भ्रमनिरास’ केल्याच्या भावनेने उत्तरोत्तर घर केले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांशी ‘जय’ या बेपत्ता वाघांवरून पंगा.
  • शक्तिशाली प्रफुल्ल पटेल हे पटोलेंचे खरे प्रतिस्पर्धी. त्यांच्याविरुद्ध लढण्यास ताकद देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पटेलांच्या केलेल्या कौतुकांनी पटोले अधिकच दुखावले.