चीनच्या भिंतीवर योग प्रात्यक्षिके; लंडनमध्येही योगाभ्यास

तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची जगभरात उत्साही तयारी सुरू आहे. योगदिनाच्या पूर्वसंध्येला जनप्रसिद्ध चीनच्या भिंतीवर योगांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये चीनबरोबर भारतीय नागरिकांचा सहभाग होता. या वेळी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन येथील भारतीय दूतावास व बीजिंग चायनीज पीपल्स असोसिएशन फॉर फ्रेंडशिप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

व्ही. के. सिंह यांनी योगाचे फायदे सांगून ही भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे नमूद केले. या वेळी २०० जण या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर मोरारजी देसाई इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या २० सदस्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हे पथक चीनच्या दौऱ्यावर आले आहे. जगप्रसिद्ध भिंतीवर योगासनांच्या सादरीकरणामुळे हा सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जात आहे.

ब्रिटनमध्ये तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पाश्र्वभूमीवर ट्रॅफ्लॅगर चौकात योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी ब्रिटनमधील नागरिकांसह पर्यटकांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

भारतीय दूतावास, भारतीय पर्यटन विभाग, ब्रिटनमधील योगा संघटना यांच्या वतीने ‘व्हिल ऑफ योगा’ या कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. २१ जून रोजी लंडनमधील थेम्स नदीच्या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होणार आहे. ‘शांततेसाठी योग’ अशी यंदाच्या या योगदिनाची घोषणा आहे. ब्रिटनमधील भारतीय राजदूत दिनेश पटनाईक यांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभासाठी योग अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जगभरातील नागरिकांना याचा निश्चित लाभ होईल, असेही ते म्हणाले. थेम्स नदीच्या काठावर अनेक वर्षांपासून योगासनांचे आणि ध्यानधारणेच्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते.\

विद्यापीठांना योगदिनाचा अहवाल बंधनकारक

यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना योगदिनी कार्यक्रमांचे आयोजन बंधनकारक केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमांची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविणे विद्यापीठांना बंधनकारक असणार आहे.

अमेरिकेत विशेष योगासत्र

भारतीय वंशाच्या अमेरिकेतील नागरिकांनी तिसऱ्या जागतिक योगदिनाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित विशेष योगासत्रात सहभाग नोंदविला. हे योगासत्र भारतीय दूतावासाकडून आयोजित करण्यात आले होते. भारतीय राजदूत रिवा गांगुली दास यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दूतावासाच्या परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सहभागी झालेल्यांना सूर्यनमस्कार, प्राणायम आणि इतर योगासनांची माहिती देण्यात आली.