ख्यातनाम भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या पुंज यांत्रिकीतील एका गूढ सिद्धांताच्या आधारे अतिशय सुरक्षित इंटरनेट तयार करणे शक्य होणार आहे, असे एका नव्या अभ्यासात दिसून आले आहे.
हा गूढ सिद्धांत असल्याने त्याला स्पुकी थिअरी असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियातील स्वाइनबर्ग तंत्रज्ञान विद्यापीठ व चीनचे पेकिंग विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आइनस्टाइनने पुंज भौतिकीबाबत दूर अंतरावरील क्रियांबाबतचा गूढ सिद्धांत मांडला होता.
१९३५ मध्ये आइनस्टाइन व त्यांच्या संशोधक सहकाऱ्यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार कण लांब अंतरावर असतानाही ते एकमेकांशी गूढ शक्तीने बांधलेले असतात. आतापर्यंत याचा वापर दोन व्यक्तींमधील संदेश सुरक्षित पातळीवर पाठवण्यासाठी केला जात होता मग त्या व्यक्तींमधील अवकाश कितीही मोठा असो, असे स्वाइनबर्ग येथील सेंटर फॉर क्वांटम अँड ऑप्टिकल सायन्सच्या सहायक प्राध्यापक मार्गारेट रीड यांनी सांगितले. त्यांच्या संशोधन निबंधानुसार हे संदेश दोन किंवा अधिक व्यक्तींना सुरक्षितपणे पाठवता येतात, त्यामुळे पुंज इंटरनेटला (क्वांटम इंटरनेट) अधिक सुरक्षितपणे वापरता येईल. १९९० मध्ये वैज्ञानिकांनी सांकेतिक पद्धतीने संदेश पाठवण्यासाठी आइनस्टाइनची पद्धत वापरली व तो संकेत उलगडताही आला. क्वांटम की या तंत्राचा वापर करून संदेश कुठेही पकडला न जाता पाठवता येतो तो मधूनच कुणाला चोरता येत नाही. जास्तीत जास्त लोकांनी आइनस्टाइनच्या या सिद्धांताचा म्हणजे क्वांटम की या तंत्राचा वापर केला तर एका वेळी अनेक जण अनेकांना सुरक्षितपणे संदेश पाठवू शकतील. तीन ते चार लोक सुरक्षितपणे संदेश पाठवू शकतात हे सिद्ध झालेले आहे, असे रीड यांनी सांगितले.
एखादा संदेश चोरला जाऊ नये म्हणजे समजा आयफोनमधून पाठवलेला संदेश त्रयस्थ व्यक्तीला हॅक करता येऊ नये अशी स्थिती आइनस्टाइनच्या गुप्त सांकेतिक चावीने निर्माण करता येते. यातून इंटरनेटवरून माहिती अधिक सुरक्षितपणे आदानप्रदान करता येईल, संदेश चोरून वाचता येणार नाहीत असे रीड यांचे मत आहे.