असहिष्णुता आणि बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नांनी भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासासमोर गंभीर आव्हान उभे केले आहे, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे स्पष्ट केले.

राहुल गांधी हे दोन आठवडय़ांच्या अमेरिका दौऱ्यावर आले असून त्यांनी भारतीय, दक्षिण आशियाई तज्ज्ञांसमवेतच्या गोलमेज परिषदेसह अनेक बैठकांना हजेरी लावली. सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसच्या (कॅप) प्रमुख नीरा टंडन, अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा हेही काही बैठकांना हजर होते. व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या दक्षिण आशिया विभागाच्या प्रमुख लिसा कर्टिस यांनी गांधी यांच्याशी चर्चा केली. भारत-अमेरिका संबंधांबाबत त्यांनी गांधी यांची मते जाणून घेतली. यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गांधी यांनी यूएस चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष थॉमस डोनोह्य़ू यांच्याशी चर्चा केली.

भारतात रोजगारनिर्मिती करण्यात सरकार असमर्थ असल्याबद्दल गांधी यांनी चर्चेच्या वेळी चिंता व्यक्त केली. सरकारच्या असमर्थतेमुळे देश धोकादायक स्थितीकडे चालला असल्याचे गांधी म्हणाले. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या संपादकीय मंडळासमवेतही गांधी यांना अनौपचारिक चर्चा केली. त्या वेळी गांधी यांनी जगातील असहिष्णुतेबद्दल विशेषत: भारतातील असहिष्णुतेबद्दल वेदना व्यक्त केली. रोजगार आणि असहिष्णुता या भारताला भेडसावणाऱ्या मुख्य समस्या असल्याचे चर्चेत सहभागी झालेल्यांनी मान्य केले.

घराणेशाहीबाबतचे वक्तव्य राहुल यांच्यावर जेटलींची टीका

घराणेशाही भारताच्या स्वभावधर्मातच आहे, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी टीका केली आहे. घराणेशाही देशाच्या स्वभावातच आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी अमेरिकेत केले. त्याची आपल्याला लाज वाटते, असे जेटली यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. काही पक्षांना घराणेशाहीचे वलय वाटते मात्र दीर्घकाळाचा विचार करता ते लाभदायक नाही, असे जेटली म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही टीका केली आहे.