अलीबाबा ग्रुप होल्डिंग लि.च्या समभागांची विक्री शुक्रवारी सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी या विक्रीने तब्बल ३८ टक्क्य़ांचा टप्पा गाठला. आयपीओच्या इतिहासात सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारूपास येण्याची शक्यता असलेल्या या कंपनीचे समभाग मिळावे यासाठी गुंतवणूकदारांनी उडय़ा घेतल्या.
चीनमधील ई-कॉमर्स कंपनीची सुरुवात मोठय़ा धडाक्यात झालीय. जॅक मा हा या कंपनीचा संस्थापक असून त्याने १९९९ मध्ये आपल्या घरातच ती सुरू केली आणि आता ८० टक्के ऑनलाइन विक्री चीनमध्येच झाली आहे. जवळपास १०० जण न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज इमारतीच्या बाहेर जमले. त्यापैकी बहुसंख्य चीनचे पर्यटक होते. कुंग फू स्टार जेट ली याच्यासमवेत जॅक मा त्या इमारतीमधून अवतरला आणि त्यांच्या जयघोषाने आसमंत दणाणला.
 दुपारपूर्वीच ९२.७० डॉलर या दराने समभाग विक्री सुरू झाली आणि अल्पावधीतच त्याने ९९.७० डॉलरचा टप्पा गाठला. जवळपास २७१ दशलक्ष समाभागांची विक्री झाली. तरीही ही संख्या जनरल मोटर्स कंपनी आणि फेसबुक इनकॉर्पोरेट आयपीओच्या विक्रीपेक्षा कमीच आहे.
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये आपण २० वर्षांत प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणावर विक्री पाहिली, असे जे. स्ट्रेइचर अॅण्ड कंपनीचे भागीदार मार्क ओट्टो यांनी सांगितले. सदर कंपनी अन्य स्पर्धक कंपन्यांप्रमाणेच चांगला नफा मिळवू शकेल आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना चीनच्या वृद्धीत सहभागी होता येईल, असेही ओट्टो म्हणाले.
आयपीओच्या दरामुळे अलीबाबा कंपनीने गुरुवारी सुरुवातीला २१.८ अब्ज डॉलर उभे केले, असे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या जागतिक व्यापाराचे प्रमुख स्कॉट कटलर म्हणाले.