इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) २०११ मधील एका सामन्यादरम्यान मुंबईत वानखेडे स्टेडियमवर बॉम्बस्फोट करण्याचा इंडियन मुजाहिदीनचा डाव होता. त्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी वकास इब्राहिम साद याने स्टेडियममध्ये प्रवेश मिळवून पाहणीही केली होती. मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे बॉम्ब ठेवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा कट रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासिन भटकळ आणि अन्य दहशतवादी असादुल्लाह अख्तर हे दोघे सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात आहेत. १३ जुलै २०११ मध्ये दादर, ऑपेरा हाऊस आणि झव्हेरी बाजार येथे बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. प्रत्यक्षात २० ठिकाणी एकाच वेळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा त्यांचा डाव होता; परंतु वकास डेंग्यूने आजारी पडल्यामुळे हा कट फसला. मात्र यासिनसह असादुल्लाह आणि वकास या तिघांनी मुंबईचे पोलीस आयुक्तालय तसेच दहशतवादविरोधी पथकाचे नागपाडा येथील मुख्यालय येथे सतत जाऊन पाहणी केली होती, ही माहितीही उघड झाली आहे.
२० एप्रिल २०११ रोजी मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरिअर यांच्यामध्ये सामना होता. यासिनच्या आदेशावरून या सामन्याचे तिकीट मिळवून वकासने स्टेडियममध्ये प्रवेश मिळविला होता. स्टेडियमची संपूर्ण माहिती घेण्याची जबाबदारी वकासवर होती. स्टेडियममध्ये शिरून कुठे बॉम्ब ठेवता येईल का, याचा अंदाजही त्याने घेतला होता. दुसऱ्या दिवशी वकास आणि असादुल्लाह पुन्हा वानखेडे स्टेडियम परिसरात गेले होते. बाहेरून त्यांनी स्टेडियमची पाहणी केली. परंतु अभूतपूर्व पोलीस बंदोबस्तामुळे स्टेडियमच्या आसपासही बॉम्ब ठेवणे शक्य नसल्याचे या दोघांच्या लक्षात आले आणि त्यामुळेच ही योजना रद्द करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासिन तसेच असादुल्लाह या दोघांनी गोवा तसेच जुहू चौपाटीचीही पाहणी केली होती. या ठिकाणी प्रामुख्याने परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव होता. यासिनने २००५ मध्ये तर असादुल्लाहने २००९ मध्ये पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले होते.