गृहमंत्रालयाने इशारा देऊनही चालढकल; मुदतवाढीचाही उपयोग नाही

महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात गर्क असल्यामुळे कदाचित राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) बहुतांश अधिकाऱ्यांना स्वत:च्या स्थावर संपत्तीची माहिती गोळा करण्यास वेळ मिळत नसावा! कारण त्याचमुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक मुदतवाढ देऊन आणि कारवाईचा इशारा देऊनही बहुतांश आयपीएस अधिकाऱ्यांनी संपत्तीची विवरणपत्रे (आयपीआर) सादर केलेली नाहीत. त्यामध्ये राज्याचे मावळते पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, सुबोधकुमार जयस्वाल, संजय बर्वे, विष्णुदेव मिश्रा या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते अगदी दोन-तीन वर्षांपूर्वीच सेवेत आलेल्या तरुण आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

२०१३-१४, १४-१५ आणि १५-१६ या तीन वर्षांची विवरणपत्रे भरण्यासाठी केंद्राने ३१ जुलै ही अखेरची मुदत दिली होती. तरीदेखील अखिल भारतीय सेवांतील अधिकाऱ्यांनी त्यास दाद न दिल्याने आणखी पाच महिन्यांची म्हणजे ३१ डिसेंबपर्यंत मुदत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. त्या पाश्र्वभूमीवर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांनी मालमत्तेची माहिती देण्याबाबत केलेले दुर्लक्ष डोळ्यावर येणारे आहे. गृहमंत्रालयाकडील ताज्या माहितीनुसार, १२-१३मधील विवरणपत्रे ८६, तर १३-१४ची माहिती राज्यातील ९७ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. १४-१५ मध्ये ही संख्या थोडी घटून ५८वर आली आणि आता १५-१६मध्ये ती ४९वर पोचली आहे. या ४९ मधील बहुतांश अधिकाऱ्यांनी सलग चार वर्षांपासूनच विवरणपत्रे न भरण्याचे साहस दाखविले आहे.

२०१३च्या लोकपाल- लोकायुक्त कायद्याच्या ४४ व्या कलमानुसार, सर्वच सरकारी अधिकाऱ्यांना दरवर्षी ३१ जुलैपूर्वी स्थावर मालमत्तेची माहिती केंद्राला द्यावी लागते आणि ती संकलित करून ३१ ऑगस्टपर्यंत केंद्राला प्रसिद्ध करावी लागते. मात्र कायद्यातील या तरतुदीला आयएसएस, आयपीएस, आयएफएस आदी अखिल भारतीय सेवांतील बडे अधिकारी धडधडीतपणे धाब्यावर बसवीत असल्याचे चित्र आहे.

हेच ते अधिकारी..

प्रवीण दीक्षित, के. के. पाठक, सुबोधकुमार जयस्वाल, विष्णुदेव मिश्रा, के.एल. बिष्णोई, अहमद जावेद (सध्या सौदी अरेबियात राजदूत), मिलिंद भारंबे, आशुतोष डुंबरे, संजय बर्वे, डॉ. के. व्यंकटेशम, एस.के. तरवडे, एस. आर. पारसकर, राजेश कुमार, एस.ई.शिंदे, व्ही.आर. कांबळे, के.ई. जाधव, किरण आर. शेलार, सुनील फुलारी, प्रताप दिघावकर, डी. वाय. मंडलिक, एस. आर. दिघावकर, शारदा निकम, ए.व्ही. जाधव, पी. आर. पवार, पी. आर. बुधवंत, बी. जी. शेखर, एस.डी. बाविस्कर, अनिल डी. कुंभारे, एम.आर. घुर्ये, डॉ. डी.एस. चव्हाण, डी. आर. सावंत, आर.बी. डहाळे, एस.एच. महावरकर, एस.जी. दाभाडे, एस.डी. येनपुरे, जे.डी. सुपेकर, ए.व्ही. मंडय़ा, ए.आर. मोराळे, एस. बी. जाधव, के.ए. कणसे, संदीप कर्णिक, सुनील फुलारी, प्रशांत होळकर, डॉ. बसवराज तेली, डॉ. प्रियांका नारनवरे, सुहैल शर्मा, डॉ. प्रवीण मुंडे, डॉ. जे.व्ही. जाधव, चिन्मय पंडित, राजतिलक रौशन, नीलोत्पल, निमित गोयल, अजय कुमार बन्सल, लोहित मतानी, पी. निखिल नंदकुमार, विशाल सिरगुरी, जयंत मीना, एच. एम. बैजल, एस.बी. पाटील आणि एस.डी. आवाड  (स्रोत : केंद्रीय गृहमंत्रालय)