पाकिस्तानसाठी गुरूवारचा (दि. २९) दिवस दुहेरी दणका देणार ठरला. भारताने उरी हल्ल्याचा बदला म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी व पाक सैन्यांना कंठस्नान घातले. या धक्क्यातून सावरायच्या आतच पाकिस्तानच्या इराण सीमारेषेवर इराण सैन्य दलाने पाकिस्तानमध्ये उखळी तोफा डागल्याचे वृत्त समोर आले आहे. बलुचिस्तान येथील अधिकाऱ्याने हा अचानक झालेला हल्ला असल्याचे सांगितले.

इराण-पाकिस्तानच्या सीमारेषेवर पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातील पंजोर जिल्ह्यात इराण लष्कराने उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तीनवेळा उखळी तोफांचा मारा केल्याचे इराणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. फ्रंटीयर चेकपोस्ट व करीम दाद भागात हे हल्ले करण्यात आले होते.
पाकिस्तान आणि इराणची सीमारेषा सुमारे ९०० किलोमीटर इतकी आहे. पाकिस्तान इराणच्या सीमेजवळ दहशतवाद्यांना आसरा देतो. हेच दहशतवादी इराणवर वारंवार हल्ले करतात असा आरोप इराणकडून वारंवार केला जातो. दोन्ही देशांदरम्यान यापूर्वीही अनेकवेळा चकमकी उडाल्या होत्या. पाकिस्तान व इराणमध्ये २०१४ मध्ये झालेल्या करारानुसार दहशतवाद्याविरोधात एकमेकांच्या साहाय्याने लढा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत असे घडताना दिसलेले नाही.
दरम्यान, गुरूवारी भारतीय सैन्य दलाने सीमारेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सुमारे ४२ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्याचबरोबर अनेक दहशतवादी तळ नष्ट केल्याचे सांगण्यात येते. परंतु दुसरीकडे भारताने सर्जिकल स्ट्राईक केला नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.