डिसेंबर २०११ मध्ये ताब्यात घेतलेल्या एका अमेरिकी ड्रोनची नक्कल उतरवण्यात यश आल्याचा दावा इराणने सोमवारी केला. इराणच्या अणुभट्टय़ांची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने हेरगिरी करण्यासाठी येथील एका तळावर २०११च्या अखेरीस ‘यूएस आर क्यू-१७० सेंटिनेल’ हे लढाऊ विमान उतरवण्यात आले होते. त्याच वेळी इराणच्या सैन्यदलाने ते ताब्यात घेतले.
ड्रोनचे रहस्य उलगडण्यात आमच्या अभियंत्यांना यश आले असून प्रत्रिडोन तयार करण्यात आले आहे. लवकरच त्याची चाचणी घेण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने एका सरकारी वाहिनीवर बोलताना सांगितले.
 वाहिनीवर लढाऊ विमानाची प्रतिकृतीही दाखवण्यात आली. बॅलास्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनबाबात आधुनिक संशोधन करणाऱ्या इराण सैन्यदलाच्या रिव्हॉल्यूशनरी गार्डसने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला देशाचे सर्वोच्च नेते आयातोल्लाह अली खोमेनी यांनी भेट दिल्याचेही वाहिनीवर प्रसारित करण्यात येत होते.  
इराणने ड्रोनच्या जवळपास जाणारी दोन विमाने तयार केली आहेत आणि देशाने जो लढा पुकारला आहे, त्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास खोमेनी यांनी व्यक्त केला. अतिउच्च तंत्रज्ञानाने सिद्ध असलेले ड्रोन इराणच्या वाळवंटी प्रदेशात सुरक्षितरीत्या सापडल्याचे इराण सरकारने स्पष्ट केले आहे.