उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला आव्हान दिले असून इराणने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इराणने क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन क्षेपणास्त्र चाचणी केल्याची घोषणा करण्यात आली. शुक्रवारी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली असे समजते. हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. इराणने नियमाला अनुसरुनच क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा केला आहे. तर इराणने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केला असा अमेरिकेचा दावा आहे. क्षेपणास्त्र चाचणी करुन इराणने अमेरिकेला आव्हान दिले आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी क्षेपणास्त्र चाचणीविषयी भाष्य केले होते. अमेरिका आणि फ्रान्सच्या विरोधानंतरही इराण क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरूच ठेवणार, देशाची सुरक्षा आणखी भक्कम करणार असे त्यांनी म्हटले होते. तुम्हाला आमचा निर्णय आवडो किंवा न आवडो, आम्ही स्वतःच्या रक्षणावर भर देणार, असे रोहानींनी म्हटले होते. जुलै २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे पाच कायम सदस्य, युरोपियन युनियन आणि इराण यांच्यात अणुप्रश्नाविषयी सर्वसहमती झाली होती. यानंतर इराणवरील आर्थिक आणि राजकीय बंधने उठवण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच इराणवर निर्बंध घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. यानुसार इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात मदत करणारे आणि या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी आर्थिक हितसंबंध असलेल्यांना आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इराण अणुकरार रद्द करण्याचे इशारा दिला होता.