मुंबई-गोव्यादरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये ३३७ हेडफोन्स चोरीला गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता रेल्वेकडून तेजस एक्स्प्रेसमध्ये अतिशय कमी किमतीचे हेडफोन्स देण्यात येत आहेत. मागील सोमवारी तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली.

इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझन कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) प्रवक्त्यांनी तेजसमधील नेमके किती हेडफोन्स चोरीला गेले आहेत, याबद्दलची माहिती दिली नाही. मात्र प्रत्येकी ३० रुपये किमतीचे १ हजार हेडफोन्स खरेदी करण्यात आल्याचे आयआरसीटीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तेजस एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांसह मनोरंजनासाठी हेडफोन्स देण्यात आले होते. मात्र बहुतांश हेडफोन्सची चोरी झाल्याने आता तेजस एक्स्प्रेसमध्ये साधे हेडफोन्स देण्यात येत आहेत.

वाचा- Tejas Express: ‘तेजस’मध्येही काहींनी औकात दाखवली!, हेडफोन्सची चोरी, एलईडीची तोडफोड

तेजस एक्स्प्रेसमध्ये रेल्वेने विमानासारख्या सोयी उपलब्ध करुन दिल्या आहेत. या रेल्वेमध्ये ९९० सीट्स असून १३ पॅसेंजर कोचेस आहेत. यामध्ये एक्झिक्युटिव्ह कोचचादेखील समावेश आहे. प्रत्येक सीटसाठी मनोरंजनाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये चित्रपट, गाणी, एफएम चॅनेल्स आणि गेम्सचा समावेश आहे. यासोबतच रेल्वेने ब्रँडेड हेडफोनदेखील उपलब्ध करुन दिले होते. तेजस एक्स्प्रेसचा प्रवास सुरु होण्याआधी प्रवाशांना हेडफोन्स दिले जात होते. पहिल्या चार फेऱ्यांआधी रेल्वेने दिलेले बहुतांश हेडफोन्स प्रवाशांनी परत केले नाहीत. यासोबतच प्रवाशांनी इन्फोटेनमेंट स्क्रिनचीदेखील मोडतोड केली.

‘सुरुवातीला तेजस एक्स्प्रेससाठी खरेदी करण्यात आलेल्या एका हेडफोनची किंमत २०० रुपये इतकी होती. आता नव्याने खरेदी करण्यात आलेल्या हेडफोन्सची किंमत ३० रुपये आहे,’ अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे. ‘अनेक प्रवासी रेल्वेतून उतरताना हेडफोन परत करत नाहीत. बहुतांश प्रवाशांना हेडफोनची किंमत रेल्वे तिकिटातून आकारण्यात आली आहे, असे वाटते’, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.  ‘रेल्वे प्रशासन चोरीला गेलेल्या हेडफोन्सची किंमत पगारातून वसूल करेल’, अशी भीती रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.