‘आयआरसीटीसी’च्या हॉटेल घोटाळा प्रकरणात आता लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांची चौकशी होणार आहे. अंमलबजावणी संचलनालयाने त्यांना समन्स बजावले आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात सीबीआयनेही माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, दोघेही चौकशीला हजर राहिले नाहीत.

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या ताब्यातील रांची (झारखंड) आणि पुरी (ओडिशा) येथील ‘बीएनआर’ हॉटेल्स ‘आयआरसीटीसी’ला चालवायला दिली होती. यानंतर ‘आयआरसीटीसी’ने लालूप्रसाद यादव यांच्या आदेशावरुन निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करुन या हॉटेल्सचे व्यवस्थापन ‘सुजाता हॉटेल्स प्रा. लि’ या कंपनीकडे सोपवले होते, असा आरोप झाला होता. या प्रकरणी सीबीआयने जुलैमध्ये लालूप्रसाद, त्यांचा मुलगा तेजस्वी आणि पत्नी राबडीदेवी यांच्यासह आयआरसीटीसीचे अधिकारी आणि इतर दोघांविरोधात एफआयआर दाखल केला होता. ११ आणि १२ सप्टेंबरला सीबीआयने लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, ते चौकशीला हजर झाले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने गेल्या आठवड्यातही राबडीदेवींना समन्स बजावले होते. मात्र त्यावेळीही त्या हजर झाल्या नाहीत.

सीबीआयने लालूप्रसाद यादव कुटुंबीयांशी संबंधित देशभरातील १२ ठिकाणांवर छापेही टाकले होते. लालूप्रसाद यादव २००६ मध्ये रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या ताब्यातील रांची (झारखंड) आणि पुरी (ओडिशा) येथील ‘बीएनआर’ हॉटेल्स ‘आयआरसीटीसी’ला चालवायला दिली होती. यानंतर ‘आयआरसीटीसी’ने लालूप्रसाद यादव यांच्या आदेशावरुन निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करुन या हॉटेल्सचे व्यवस्थापन ‘सुजाता हॉटेल्स प्रा. लि’ या कंपनीकडे सोपवले होते. ही कंपनी लालूप्रसाद यांचे सहकारी आणि तत्कालीन केंद्रीय कंपनी व्यवहार खात्याचे प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी सरला यांची होती. या मोबदल्यात लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित ‘डिलाइट मार्केटिंग’ कंपनीला अत्यल्प किंमतीमध्ये पाटणा येथील तीन एकर भूखंड मिळाला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यांच्यासह राजदचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी सरला, ‘आयआरसीटीसी’ या कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक पी. के. गोयल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला होता.