आयआरसीटीसीने सोमवारी प्रवासी विमा आणि अनारक्षित तिकीटासह अनेक योजनांची घोषणा केली. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीटाचे बुकिंग करताना केवळ एक रुपयाच्या प्रिमियममध्ये रेल्वे प्रवाशाचा १० लाखांचा विमा उतरविण्यात येईल. ही सुविधा ३१ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल. याविषयी अधिक माहिती देताना आयआरसीटीसीचे संचालक आणि महाव्यवस्थापक अरुण कुमार मनोचा म्हणाले की, लवकरच आम्ही प्रवासी विमा योजना सुरू करणार आहोत. यासाठीचा पत्रव्यवहार करण्यात आला असून, तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विम्यासाठी प्रतियात्रा २ रुपयांपेक्षादेखील कमी खर्च येईल. ज्यात प्रवाशाचा १० लाखांचा विमा उतरविण्यात येईल. आयआरसीटीसीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगाने एसबीआयच्या मोबाइल बडीच्या माध्यमातून डिजीटल पेमेंटसाठी करार केला आहे. रेल्वेचे तिकीट प्राप्त करण्यासाठीच्या अन्य प्रकारांवरदेखील काम करत असल्याची माहिती मनोचा यांनी दिली. ते पुढे म्हणाले, अनारक्षित तिकीट सिस्टीमवर काम करण्याची आमची योजना असून काही महिन्यात ही प्रणाली सुरू होईल. आयआरसीटीसीचे इंटिग्रेटेड अॅण्ड्रॉइड सॉफ्टवेअर तिकीट कॅन्सलेशन प्रक्रिया सुलभ करेल. सेंटर फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इंस्टिट्यूट मैसूर आणि पुसा येथील इंन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, केटरिंग आणि न्यूट्रिशनच्या सहयोगाने सुविधा सुधारण्यावर भर देणार असून, आयआरसीटीसी स्वतःचे ई-वॉलेट लॉन्च करण्याची योजना आखत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. कार्ड पेमेंट फेल होण्याच्या घटनांचे प्रमाण हे २ ते ३ टक्के इतके आहे. पाथवे कारणांमुळे असे होते. आम्ही ई-वॉलेट लॉन्च करण्याबाबत विचार करत असून, पहिल्या तीन महिन्यांसाठी ही सुविधा मोफत असेल. सध्या पॅनकार्डाशी सलग्न असणारे हे वॉलेट लवकरच आधार कार्डशीदेखील जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दसरा किंवा दिवाळीपर्यंत ई-वॉलेट लॉन्च करण्यात येईल असे ते म्हणाले.