एकाच लिंगाच्या व्यक्तींना विवाह करण्याची परवानगी देण्याच्या मुद्दय़ावर आर्यलडमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतात  ‘होय’च्या बाजूने बहुमत मिळाले आहे. समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या गटांनी या विजयाचे स्वागत केले असून, ‘नाही’साठी प्रचार करणाऱ्यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
आर्यलड प्रजासत्ताकाने समलैंगिक व्यक्तींच्या विवाहाला कायदेशीर रूप देण्याच्या बाजूने ऐतिहासिक मतदान केले असल्याचे संकेत मोजणीच्या सुरुवातीला मिळाले आहेत. पुरुष व महिला समलैंगिकांना परस्परांशी विवाह करण्याची परवानगी देण्यासाठी देशाच्या घटनेत दुरुस्ती करावी काय, असा प्रश्न ३२ लाख लोकांना विचारण्यात आला होता. शनिवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. हा बदल मान्य करण्यात आल्यास, एकाच लिंगाच्या व्यक्तींचा विवाह कायदेशीर करणारा आर्यलड हा जगातील पहिला देश ठरणार आहे.