आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इरोम शर्मिला यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काँग्रेसला कशा पद्धतीने पराभूत करायचे, याचे धडे घेतले. मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल १६ वर्षे उपोषणाचा लढा देणाऱ्या इरोम शर्मिला यांनी तेथील विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एका राजकीय पक्षाची स्थापनाही केली आहे. याच पक्षाच्या माध्यमातून त्या मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्याविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. केजरीवाल आणि शर्मिला यांच्यामध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली.
या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, इरोम शर्मिला यांची भेट घेतली. त्यांच्या लढ्याला आणि धैर्याला माझा सलाम. त्यांच्या राजकीय कारकिर्दीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने कशा पद्धतीने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रस्थापित पक्षांना धोबीपछाड दिला, याची माहिती इरोम शर्मिला यांनी जाणून घेतली. काँग्रेस आणि भाजपला हरविण्यासाठी आम आदमी पक्षाने काय रणनिती आखली होती, हे सुद्धा त्यांनी जाणून घेतले. दरम्यान, इरोम शर्मिला या आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करण्याची काहीच शक्यता नसल्याचेही सूत्राने स्पष्ट केले. मणिपूरमधील निवडणुकीसोबतच पंजाब आणि गोव्यातील विधानसभा निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचे सर्व लक्ष पंजाब आणि गोव्याकडे असणार आहे. मणिपूरमध्ये आप तितकी ताकद लावणार नाही, असेही या सूत्राने म्हटले आहे.
मणिपूरमधील निवडणूक लढवायची नाही, हे आम आदमी पक्षाने सहा महिन्यांपूर्वीच निश्चित केले होते. आता एकदम त्यामध्ये बदल करण्याचा प्रश्नच येत नाही. केजरीवाल यांना इरोम शर्मिला यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांची भेट घेतली, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.