भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून पुढे येते आहे. अमित शहा आणि स्मृती इराणी या दोघांनाही भाजपनं गुजरातमधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठवलं जाणार आहे. गुजरातमध्ये भाजपचं जे वर्चस्व आहे ते पाहता या दोघांकडेही राज्यसभेची खासदारकी येणं निश्चित मानलं जातं आहे.

सध्याच्या घडीला अमित शहा हे गुजरातच्या सरखेज विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. मात्र आता अमित शहांना खासदारकी देऊन त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची धुरा दिली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अमित शहांच्या खासदारकीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांना संरक्षण मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. मार्च २०१७ मध्ये मनोहर पर्ऱिकर यांनी राजीनामा दिल्यापासून संरक्षण मंत्री पद कोणालाही देण्यात आलेलं नाही, केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांच्याकडेच देण्यात आली आहे. मात्र या पदासाठी एक खासदार भाजपला हवा आहे. त्याचमुळे अमित शहा यांना राज्यसभेवर पाठवून खासदार करायचं आणि केंद्रीय संरक्षणमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालायची हा भाजपचा अॅक्शन प्लान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध टोकाला पोहचले आहेत.

अशात नरेंद्र मोदी सरकारवर टीका होते आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी एका ठाम निर्णय घेणाऱ्या संरक्षण मंत्र्याची देशाला गरज आहे त्याचमुळे अमित शहा यांना हे पद मिळू शकतं अशी चर्चा रंगली आहे. देशाची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात मोठी प्राथमिकता आहे असा संदेश या निर्णयातून मोदी सरकार जनतेपुढे ठेवू शकतं असंही बोललं जातंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये दुसरं कोणतं मोठं नाव असेल तर ते अमित शहा हेच आहे ही बाब आता सर्वश्रुत आहे. काही दिग्गज जाणकारांच्या मते अमित शहांना कॅबिनेटमध्ये आणलं जाईल मात्र त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद दिलं जाईलच असं नाही. मात्र नरेंद्र मोदी हे धक्कातंत्रानं निर्णय घेण्यात आणि टायमिंग साधण्यात प्रसिद्ध आहेत. त्याचमुळे अमित शहांच्या खासदारकी मागे वेगळी गणितं असू शकतात अशा चर्चांनाही उधाण आलं आहे.

अमित शहा यांना नरेंद्र मोदींचा वजीर समजलं जातं. आजवर झालेल्या निवडणुकांमध्येही अमित शहांची भूमिका मोठी आहे त्या सगळ्याचा विचार करता अमित शहा यांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशीच शक्यता वर्तवली जाते आहे. आता काय होणार हे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.