नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील दहशतवाद कमी झाला, असा दावा करणाऱ्या भाजपला गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिमटे काढले. उद्धव ठाकरे सध्या दिल्लीत असून त्यांनी आज पत्रकारपरिषद घेतली. यावेळी उद्धव यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जाहीर वाभाडे काढले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे दहशतवाद संपेल, असा दावा भाजपकडून करण्यात येतो. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर देशातील दहशतवाद किंवा काळ्या धनाची निर्मिती खरोखरच थांबली आहे का?, असा सवाल उपस्थित करत उद्धव यांनी सरकारला घरचा आहेर दिला. नोटीबंदीमुळे दहशतवाद संपणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला नवा मार्ग दाखवला आहे. जगातील सर्व देशांनी नोटाबंदीची अंमलबजावणी करून दहशतवाद कायमचा संपवला पाहिजे, अशी खोचक टीकाही उद्धव यांनी केली. आगामी काळात संसदेत नोटाबंदीच्या मुद्द्यावर मतदान झाल्यास शिवसेना काय भूमिका घेणार, असा प्रश्नही यावेळी उद्धव यांना विचारण्यात आला. तेव्हा शिवसेना नेहमी जनतेच्या बाजूने राहील, असे सूचक विधानही उद्धव यांनी केले.

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे  यांनी अडचणीच्या प्रश्नांना उत्तर देताना मोदी सरकारच्या भूमिकेपासून स्पष्टपणे फारकत घेतली. तसेच मित्रपक्ष म्हणून कधीतरी सरकारच्या बाजूने उभे राहावे लागते, असे सांगत आपली राजकीय अपरिहार्यताही व्यक्त केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि काळ्या धनाविरूद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाकिस्ताकडून सीमेवर अजूनही हल्ले सुरू आहेत. तसेच नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळ्या धनाची निर्मितीही सुरूच आहे. मुळात या निर्णयाबाबत अनेक अर्थतज्ज्ञ साशंक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी उद्धव यांना अडचणीत टाकणारे अनेक प्रश्न विचारले. त्यावर उद्धव यांनी नोटाबंदीचा निर्णय मी नव्हे तर पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. तेव्हा तुम्ही हे प्रश्न त्यांनाच विचारा, असे उद्धव यांनी म्हटले.