फोनवर तलाक देणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करत मुस्लिम महिलांनाही त्यांचे अधिकार मिळणे गरजेचे असून त्रिवार तलाकच्या मुद्द्याला राजकीय रंग देऊ नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते उत्तरप्रदेशमधील एका जाहीर सभेत बोलत होते.

तोंडी तलाकच्या मुद्द्यावरुन सध्या वाद निर्माण झाला असून महिलांसाठी अन्यायकारक असलेली ही पद्धत बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. केंद्र सरकारनेही याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तोंडी तलाकला विरोध दर्शवला आहे. यावरुन राजकारण सुरु झाले असून उत्तरप्रदेशमधील सभेत मोदींनी तोंडी तलाकच्या वादावर भाष्य केले. काही राजकीय पक्ष तोंडी तलाकच्या मुद्दयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. तोंडी तलाकमुळे मुस्लिम तरुणींचे आयुष्य का उद्ध्वस्त होऊ द्यायचे असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. तोंडी तलाकला हिंदू – मुस्लिम असा रंग देऊ नका असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.  मतपेटीवर डोळा ठेवून काही पक्ष मुस्लिम महिलांना त्यांच्या मुलभूत हक्कांपासून लांब ठेवत आहे हे बघून आश्चर्य वाटते असे मोदी म्हणालेत. यावरुन राजकारण न करता महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्या असे त्यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशच्या राजकारणावरुन टीका करताना मोदी म्हणाले,  सत्तेत समाजवादी पक्ष असो किंवा बहुजन समाजपक्ष असो, दोघांनीही सत्तेत असताना लुबाडलेच. बुंदेलखंडसाठी आम्ही पैसे दिले पण अद्याप तिथे काम सुरु झालेले नाही.पण आता तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका. एकाला आपले कुटुंब वाचवायचे आहे तर एकाला फक्त खुर्चीची हौस आहे. तर आम्हाला मात्र राज्याची चिंता आहे. समाजवादी आणि बसपच्या जाळ्यातून या राज्याची सुटका करायची आहे आणि राज्याला ‘उत्तम प्रदेश’ बनवायचे आहे असे मोदींनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजपचीच एक हाती सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.  उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहेत. मीदेखील उत्तरप्रदेशमधूनच निवडून गेलो आहे. मला या राज्यासाठी अन्य पंतप्रधानांपेक्षा जास्त काम करायचे आहे असे त्यांनी सांगितले.